
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर एकेरी भाषेत केलेल्या टीकेवरून आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पडळकर यांचा जाहीर निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याची गंभीर दखल घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. ‘ज्या खालच्या थराला जाऊन टीका होत आहे, ती काही महाराष्ट्राची संस्कृती नाही, बेताल वक्तव्य करणाऱ्यांना तातडीने आवरा’ असे त्यांनी फडणवीस यांना सांगितले.
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करत भाजपच्या आमदाराने केलेल्या कृतीचा निषेध केला. त्यानंतर आपण पडळकरांना समज दिली असल्याचे फडणकीस यांनी सांगितले.
फडणवीसांकडून पडळकरांची कानउघाडणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्या फोननंतर पडळकर यांची कानउघाडणी केली. पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘पडळकर यांनी केलेल्या विधानांचे कधीच समर्थन करता येणार नाही. पडळकर हे तरुण नेते आहेत. अनेकदा ते बोलताना आपल्या आक्रमक विधानाचा काय अर्थ निघेल हे लक्षात घेत नाहीत. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघत असतील याचा विचार करायला हवा, असा सल्ला मी त्यांना दिला आहे.’ असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.