
रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा महाविद्यालयातील शिक्षक रामचंद्र गवळी यांना हजेरी घोटाळा करणे चांगलेच महागात पडले आहे. जव्हार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माया मथुरे यांनी गवळी यांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे दांड्या मारल्यानंतरही मास्टरमध्ये झोल करणाऱ्या मास्तर तसेच अन्य आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी (सातारा) महाविद्यालयातून गवळी यांची मोखाडा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात बदली झाली होती. कार्यमुक्ती आदेश मिळूनही ते मोखाडा महाविद्यालयात तब्ब्ल तीन महिन्यांनंतर रुजू झाले होते. असे असताना मागील ५३ दिवसांच्या गैरहजर काळातील हजेरीपटावर सह्या करून पगार घेतल्याचा आरोप संस्थेने केला होता. ही बनावगिरी महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन प्राचार्य रमेश भोर यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती.
१३ वर्षांनंतर लागला निकाल
महाविद्यालयाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवून न घेता विभागीय चौकशी करण्याची सूचना केली. त्यानंतर संस्थेने आरोपीविरुद्ध चौकशी समिती नेमली असता गवळी यांच्याविरोधातील आरोप खरे असल्याचे आढळून आले. त्यामुळे महाविद्यालयाने जव्हार न्यायालयात गवळी यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता. सदर खटल्याचे कामकाज सुमारे १३ वर्षे चालले.