Jammu Kashmir – उधमपूरच्या जंगलात जोरदार धुमश्चक्री; जैशचे 3-4 दहशतवादी सापळ्यात अडकले, चकमकीत 1 जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला असून जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन ते चार दहशतवाद्यांची कोंडी केली आहे. उधमपूरमधील दुडू-बसंतवाड आणि दोडाच्या भदरवाहा येथील सोजधरच्या जंगलामध्ये ही कारवाई सुरू आहे.

व्हाईट नाईट कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दोडा-उधमपूर सीमेवरील जंगलामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. लष्कर,  विशेष ऑपरेशन्स ग्रुप आणि पोलिसांद्वारे शोध मोहीम सुरू असताना जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एक जवान जखमी झाला होता, मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरुच

– दुडू-बसंतगडच्या जंगलात 26 जूनला झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख कमांडर हैदर याचा खात्मा करण्यात आला होता. चार वर्षांपासून तो या भागामध्ये सक्रिय होता.

– बसंतगड परिसरात 25 एप्रिल रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला होता.

– जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-कश्मीर पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाई दरम्यान एके-47 रायफलसह 4 एके मॅगझिन, 20 हँडग्रेनेड, डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली.

कश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद