
विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. या दिवशी देशभरात उत्साहाचे वातावरण असते. विजयादशमीला रावणाचा पुतळा उभारून त्याचे सामूहिक दहन केले जाते, अशी प्रथा आहे. मात्र, यावर्षी या परंपरेत मोठा बदल केला जाणार आहे. इंदूरमध्ये यंदा रावण नव्हे, तर शूर्पणखा दहन केलं जाणार आहे. म्हणजेच विजयादशमीला रावणाच्या 10 तोंडाएवजी 11 महिलांचे प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशच्या इंदूरमधील पौरुष संस्थेकडून या संदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये विजयादशमीच्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पोस्टवर शुर्पणखा दहन कार्यक्रम असे लिहिण्यात आले आहे. हा कार्यक्रम इंदूरमधील महालक्ष्मी मेळा मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांच्या पुतळ्यांचे दहन केले जाणार आहेत त्यांचे फोटो देखील देण्यात आले आहेत. या महिला म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यांच्या पती आणि निष्पाप मुलांच्या निर्घृण हत्येच्या आरोपी आहेत.
दरम्यान, पोस्टरमधील सर्वाधिक चर्चेच्या प्रकरणात आरोपी असलेली सोनम रघुवंशी आणि मुस्कान रस्तोगी. या दोघींचेही फोटो या पोस्टरमध्ये लावण्यात आले आहेत. पौरूष संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या सुरुवातील सर्व प्रतिकात्मक पुतळ्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर त्यांच महालक्ष्मी नगर मेळा मैदानावर सायंकाळी साडे सहाला दहन करण्यात येईल.
इंदौरमधील पौरूष ही संघटना पत्नी पीडित पुरूषांचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या संघटनेच्या या व्हायरल पोस्टची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. ज्या प्रकारे पुरुषांवरील गुन्ह्यांचा न्याय केला जातो, त्याचप्रमाणे समाजातील पुरुषांविरुद्धच्या वाढत्या गुन्हांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असा संदेश या पोस्टमधून दिला आहे.