
>> आशिष यावले
अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने अमरावती येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या कला दालनात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन नेचर अॅण्ड वेडिंग या दोन विषयात विभागले आहे. हे प्रदर्शन आजपर्यंत खुले असे}.
छायाचित्रण हे एक स्वतंत्र कलामाध्यम आहे. छायाचित्रकार या माध्यमातून मानवी समाज व संस्कृतीतील सर्जनशीलतेची भौतिक व वैचारिक अभिव्यक्ती साकारतो. या कलेची स्वतची दृश्यभाषा आहे. जी केवळ तांत्रिक प्रािढयेपुरती मर्यादित नाही, तर ती एक सौंदर्यशास्त्र आणि संवादाची व्यापक कलाभाषा आहे.
निसर्गवैभव : निसर्ग छायाचित्रण म्हणजे केवळ कॅमेरात दृश्य टिपणे नव्हे, तर निसर्गातील सौंदर्याचा आत्मानुभव प्रकट करण्याची एक कला आहे. निसर्गाची विविध ऋतूतील विलोभनीय रूपे, आश्चर्यचकित करणारी ठिकाणे, डोंगरदऱया, धबधबे, वेगवान वाहणाऱया नद्या, घाटवाटा, विस्तीर्ण शुष्क पानझडी वने, घनदाट, मिश्र व सदाहरित वनांनी व्यापलेला विदर्भ प्रदेश, दवबिंदूंची नाजूक चमक, वाऱयावर डुलणारे गवत, फुलांवर थिरकणारी फुलपाखरे, निळ्याशार क्षितिजाचे नयनरम्य दृश्य, दूरच्या देशांतील रोमांचकारी निसर्गसौंदर्य, पशू-पक्ष्यांचे विश्व यासारख्या विविध विषयांवरची सर्वांग सुंदर छायाचित्रे या प्रदर्शित करण्यात आली आहेत.
वन्यजीव : वन्यजीव छायाचित्रणाचे तंत्र फार वेगळे आहे. प्राण्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवासात पकडून छायाचित्रण करणे अत्यंत कठीण असते. त्यासाठी जिद्द, संयम आणि सर्जनशीलता लागते. योग्य क्षण टिपण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागते. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या छायाचित्रकारांनीदेखील प्राणी जीवनातील प्रेम भावना, पशू-पक्ष्यातील वात्सल्य कलात्मकतेने टिपले आहे.
`वाईल्डबीस्ट’ या जंगली प्राण्याची शिकार करण्यासाठी चित्त्यांनी केलेली एक नाटय़मय युती, उडणारा मोर आणि त्याच्या गतीमान हालचालीचा क्षण, मासेमारीच्या जाळ्यात पक्ष्याला अडकवण्याचे दृश्य, घरमाश्यातील प्रणय, भारतीय शैलीतील हस्तनिर्मित बैलगाडी, गुढी आणि खार, दोन काळ्या डोक्याचे गुल, उबदार, नारिंगी रंगाच्या पार्श्वभूमीवर झाडाच्या फांदीवरील सरडा यासारख्या वन्यजीवांच्या हालचालींचे बारकाईने आकलन करून, छायाचित्रात नैसर्गिक घटकांचा अतिशय सूचक उपयोग केला आहे.
विवाह समारंभ : विवाह समारंभातील पारंपरिक छायाचित्रांसोबतच पॅंडिड (नैसर्गिक) फोटोग्राफी, प्री-वेडिंग फोटोग्राफी, साखरपुडा, हळद, मेहंदी समारंभ आणि प्रसंगानुरुप लग्नाच्या दिवसातील आनंदाचे क्षण छायाचित्रकारांनी कलात्मक दृष्टी व तांत्रिक कौशल्याचा पुरेपूर वापर करून टिपली आहेत. ती अतिशय बोलकी आणि सर्वांगसुंदर आहेत. केळवणातील आनंददायी संवाद, विशेषत विवाहदिनीच्या चमकदार रांगोळ्या, रंगीबेरंगी तोरण, पारंपरिक पोशाखातील वधू-वराचा प्रवेश, मंगलाष्टकादरम्यान वधू-वराच्या चेहऱयावरील स्मित हास्य, वधूच्या दागिन्यांमधील बारकावे, अंगठी, वरमाला परिधान, सप्तपदीला नवसांची देवाणघेवाण, नवरीला निरोप देतानाचा कुटुंबासोबतचा प्रेमळ आणि भावनिक प्रसंग अतिशय सुरेखतेने टिपला आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या छायाचित्रकारांमध्ये कलाकृतीत अभिनव आशय निर्माण करणारी स्वतंत्र कलादृष्टी आहे. पारंपरिक सौंदर्यशास्त्र आणि समकालीन संवेदनशीलता यांचे मिश्रण करण्याची क्षमता आहे.
(लेखक उपयोजित कलेचे अभ्यासक आहेत.)
न्यू हॉलीवूड
अक्षय शेलार
[email protected]