
>> aप्रसाद ताम्हनकर
जगाच्या काही कोपऱ्यात सुरू असलेली युद्धे आणि अशांतता यामुळे जगभरातील सुरक्षा तज्ञ चिंतेत आहेत. या युद्धांमध्ये वापरल्या जात असलेल्या आधुनिक आणि घातक तंत्रज्ञानाने भविष्यातील युद्धाची एक चुणूक जगाला दाखवून दिली आहे. अत्याधुनिक मिसाईल प्रणाली, Ai चा मोठय़ा प्रमाणावर होत असलेला वापर, टेहळणी रडारनासुद्धा धोका देऊ शकणारी विमान प्रणाली अशा अत्यंत घातक अशा युद्धतंत्राचा वापर सध्या बघायला मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर आता अंतराळसुद्धा युद्धाच्या कक्षेत आले आहे.
सध्या अंतराळात 12000 च्या आसपास उपग्रह सािढय आहेत. अमेरिका, चीन, रशिया आणि हिंदुस्थान या सध्या अंतराळ विश्वातील मोजक्या शक्तीपैकी एक आहेत. पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत असलेल्या या उपग्रहांपैकी साधारण 650 उपग्रह हे सैन्याच्या संबंधित विविध कामांसाठी वापरले जातात. यापैकी 300 उपग्रह एकटय़ा अमेरिकेचे आहेत. हिंदुस्थान, रशिया, चीन यांचेदेखील स्वतचे सैन्य उपग्रह मोठय़ा प्रमाणावर अंतराळात काम करत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या यातील काही उपग्रहांचा वापर शत्रूवर सोडलेल्या शस्त्राला दिशा दाखवण्यासाठी, यातील जीपीएस प्रणालीचा वापर वाळवंटात, जंगलात, समुद्रात सैन्याच्या ताफ्याला दिशादर्शक म्हणून केला जात असतो. अवकाशातून असे भक्कम मार्गदर्शन करणाऱया एकमेकांच्या उपग्रहांना जर आता काही देश लक्ष्य करू लागले तर? हा प्रश्न सध्या सर्वांना त्रस्त करून सोडतो आहे.
संगणकाच्या मदतीने शत्रू देशाच्या विविध सेवांवर हल्ला करणे अर्थात सायबर हल्}ा करणे हे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र विनाशस्त्र आणि सैनिकांच्या मदतीनेदेखील शत्रू देशाचे किती प्रचंड नुकसान करता येते हे या नव्या युद्धशास्त्राने दाखवून दिले. रणांगणावर लढले जाणारे युद्ध आता वेगवेगळ्या पातळीवर लढले जाऊ लागले आहे. हे युद्ध तंत्रज्ञान लवकरच अंतराळातदेखील लढले जाऊ शकते अशी भीती अनेक सुरक्षा तज्ञ व्यक्त करीत आहेत. आजपर्यंत कुठल्याही देशाने अशी आगळीक केली नसली तरी जगातील अनेक प्रमुख देशांनी उपग्रह नष्ट करू शकणारी हत्यारे बनवली आहेत आणि आपल्या ताफ्यात बाळगली आहेत हेदेखील सत्य आहे. खुद्द अमेरिकेने काही काळापूर्वी आपला स्वतचा एक उपग्रह नष्ट करून अशा तंत्राची चाचणीदेखील घेतलेली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाची अंतराळ संस्था सध्या हे सर्व नियोजन बघत असते. कोणत्याही देशाला आपला उपग्रह सोडण्यापूर्वी त्याच्याबद्दलची सर्व माहिती, तो कोणत्या कामासाठी उपयोगात आणला जाणार आहे, कुठून प्रक्षेपित केला जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती या संस्थेला द्यावी लागते. मात्र आजकाल अनेक देश उपग्रहाच्या कार्याबद्दलची महत्त्वाची माहिती लपवून ठेवतात असा आक्षेप नोंदवला जात आहे. दुसरीकडे अनेक खासगी कंपन्यांनीदेखील आपले भरमसाट उपग्रह आकाशात सोडण्यास सुरुवात केली आहे. या खासगी उपग्रहांच्या मदतीने एकमेकांची गुप्त माहिती चोरणे, एखाद्या ठिकाणावर लक्ष ठेवणे, गुप्तपणे फोटो काढणे असे उद्योगदेखील केले जात असतात. जगभरातील मुख्य देशांमध्ये चालू असलेल्या या अंतराळ स्पर्धेत हिंदुस्थानसारखा खेळाडूदेखील जोमाने उतरलेला आहे. 2029 पर्यंत 52 उपग्रह अंतराळात सोडण्याचा संकल्प नुकताच आपल्या देशाने सोडलेला आहे. सध्या अंतराळातील उपग्रहांना नाटोच्या अधिकारात संरक्षण देण्यात आलेले आहे. अर्थात एखाद्या देशाने
नाटो सदस्याच्या उपग्रहावर हल्ला केल्यास अशा देशावर कारवाई केली जाणार आहे. मात्र यापूर्वी शत्रू देशाच्या उपग्रहाच्या सिग्नलमध्ये अडथळे आणणे, खोटे सिग्नल तयार करणे अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे नक्की!