वडाळा, चेंबूरमधील माथाडींच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम दिवाळीत सुरू होणार; सहविकास नेमण्याचे अधिकार कामगारांनी दिले अविनाश रामिष्टे यांना

वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम दिवाळीदरम्यान सुरू होणार आहे. नवी मुंबईत पार पडलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेत माथाडी कामगारांनी या प्रकल्पासाठी सहविकासक नेमण्याचे अधिकार संस्थेचे अध्यक्ष अविनाश रामिष्टे यांना दिले आहेत.

कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील स्मृती भवनमध्ये माथाडी गृहनिर्माण संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत सर्वच सभासदांनी या प्रकल्पाचे मुख्य विकासक विजय सावंत यांच्या मदतीसाठी सहविकासक नेमण्याचा निर्णय घेतला. यावेळी सभासदांनी एकमताने ठराव करून सहविकासक नियुक्तीचे अधिकार संस्थेचे अध्यक्ष अविनाश रामिष्टे यांना दिले. सभासदांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता सर्व अडचणी दूर झाल्या असून दिवाळीदरम्यान काम प्रत्यक्ष सुरू होईल, अशी ग्वाही विजय सावंत यांनी यावेळी दिली.

वसाहतीला बाबुराव रामिष्टे यांचे नाव

माथाडी कामगारांचे तारणहार ठरलेले दिवंगत कामगार नेते बाबुराव रामिष्टे यांचे नाव देण्याचा ठरावही या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. अनेक अडचणी आल्यामुळे या प्रकल्पाला मोठा विलंब झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन माथाडी कामगारांना आधी ठरलेल्यापेक्षा मोठ्या आकाराची घरे मिळावीत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे माथाडी कामगारांचे नेते अविनाश रामिष्टे यांनी सांगितले.