पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मोदी जेव्हा जेव्हा अचानक बोलायला येतात तेव्हा तेव्हा मोठे निर्णय घेतात. मग नोटबंदी असो किंवा लॉकडाऊन. त्यामुळे आज मोदी काय बोलणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्या मुद्द्यांवर मोदी बोलण्याची शक्यता?

– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसाच्या वार्षिक शुल्कामध्ये जबरदस्त वाढ केली आहे. या व्हिसाचा सर्वाधिक फायदा हिंदुस्थानी घेत आहेत. त्यामुळे अमेरिकेला जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या हिंदुस्थानींना धक्का बसला आहे. यावर मोदी बोलण्याची शक्यता आहे.

– मोदी सरकारने नुकतेच वस्तू व सेवा करात (जीएसटी) सुधारणांचे पाऊल उचलले. जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यात आले असून नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. याबाबतही मोदी बोलण्याची शक्यता आहे.

– टॅरिफमुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला झटका बसला असून अनेक छोट्या उद्योगांवर सक्रांत आली आहे. त्यामुळे स्वदेशीचा वस्तू वापराबाबतही मोदी बोलण्याची शक्यता आहे.

– सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे. देशभरामध्ये नवरात्रोत्सवाची धूम असणार आहे. यावरही मोदी बोलण्याची शक्यता आहे.

– बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी काही मोठी घोषणा करण्याचीही शक्यता आहे.