अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, तिथे त्यांनी शिखरे गाठली, लेखक पी. एल. कदम यांचे गौरवोद्गार; ‘आम्ही साहित्यप्रेमी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, ते क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केले, एवढेच नव्हे तर ते शिखरावर पोहोचले. असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही, असे गौरवोद्गार निवृत्त नगररचनाकार व लेखक पुरुषोत्तम लाडू ऊर्फ पी. एल. कदम यांनी ओरोस येथे ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात काढले.

‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्यावतीने आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा पी. एल. कदम बोलत होते. शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि सिनेमा अशा विविध क्षेत्रांमध्ये अत्रेंनी भरीव काम केले. ते लेखक, कवी, विडंबनकार, चित्रपट कथालेखक, नाटककार, दिग्दर्शक, फर्डा वक्ता, शिक्षक, राजकीय नेते आणि संपादकही होते, असेही कदम म्हणाले.

मोरुची मावशी, भ्रमाचा भोपळा, कवडीचुंबक, ब्रह्मचारी अशी विनोदावर आधारित नाटके लिहितानाच अत्रे यांनी घराबाहेर, लग्नाची बेडी, उद्याचा संसार अशी गंभीर व समस्याप्रधान नाटकेही लिहिली. वेगवेगळी रूपे घेऊन महिलांची फसकणूक करणाऱ्या लबाड इसमाबाबत आलेली बातमी वाचून त्यांनी ‘तो मी नव्हेच’सारखे नाटक लिहिले आणि त्याने इतिहास घडवला, असे लेखिका डॉ. सई लळीत यांनी अत्रेंच्या नाटकांचे विवेचन केले. आचार्य अत्रे यांची ‘झेंडुची फुले’ हा विडंबन वाक्यांचा संग्रह अमोल ठेवा आहे, असे यावेळी ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांनी सांगितले. ‘आम्ही साहित्यप्रेमी’चे समन्वयक सतीश लळीत यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.

गीते, किनोद, किस्से

अ‍ॅड. सुधीर गोठणकर यांनी ‘ब्रह्मचारी’ नाटकातील ‘यमुनाजळी खेळु खेळ कन्हैया’ हे नाट्यगीत सफाईदारपणे पेश केले, तसेच बादेवा अजब तुझे सरकार’ हे स्वलिखित विडंबनगीत सादर केले. प्रिया आजगावकर, मेघना उपानेवर आणि सुस्मिता राणे यांनी ‘पाणिग्रहण’ नाटकातील ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे नाट्यगीत वेगवेगळ्या ढंगात सादर केले. अपर्णा जोशी यांनी ‘भरजरी पितांबर दिला फाडून’ हे गीत सादर केले.नम्रता रासम, नेत्रा दळवा, प्रगती पाताडे यांनीही कविता सादर केल्या.