कुत्रा-मांजरीचे भांडण ठरतेय घटस्फोटाचे कारण, भोपाळच्या जोडप्याचा कुटुंब न्यायालयात अर्ज

घरातील कुत्रा–मांजरीचे भांडण एका जोडप्याच्या घटस्फोटाचे कारण ठरू पाहत आहे. घरातील पाळीव प्राणी भांडत असल्याने अभियंता असलेल्या पती-पत्नीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला असून भोपाळच्या कुटुंब न्यायालयात अर्ज केला आहे. विशेष म्हणजे या दोघांचे लग्न आठ महिन्यांपूर्वी झाले असून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

प्राणीमित्र असलेल्या दोघांची प्राणी वाचवण्यासाठी आयोजित एका निदर्शनाच्या कार्यक्रमात ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली व या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. डिसेंबर 2024 साली त्या दोघांनी लग्न केले. पत्नी लग्नानंतर पाळीव मांजराला सासरी घेऊन आली तर पतीकडे आधीपासूनच पाळीव कुत्रा, ससा आणि फिश टँक होता. लग्नानंतर दोघेही आपापल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत होते. मात्र प्राण्यांमध्ये भांडणे होत होती. पत्नीचा आरोप आहे की, पतीचा कुत्रा तिच्या मांजरीवर भुंकत राहतो, तर पतीच्या म्हणण्यानुसार मांजर फिशटँककडे डोळे वटारून पाहते. मांजर माशांना फस्त करण्याच्या प्रयत्नांत असते. तसेच दिवसभर घरात ती म्याव म्याव करत असते. त्यामुळे दोघांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे.