पाकिस्तानचा सीमेवर पुन्हा गोळीबार; हिंदुस्थानचेही प्रत्युत्तर

दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले तरी पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाही पाकिस्तानी सैनिकांनी एलओसीजवळ छोट्या बंदुकांच्या सहाय्याने गोळीबार केला. हिंदुस्थानने देखील या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार थांबवला.

पाकिस्तानी सैन्याची आगळीक पुन्हा एकदा दिसून येत आहे. जगभरात हिंदुस्थानी लष्कराच्या नावाने आरोळ्या ठोकणाऱ्या पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानी सैनिकांनी कुपवाडामधील नौगाम भागात एलओसीजवळून चार राऊंड फायर केले तर हिंदुस्थाननेही त्याला चोख प्रत्युतर देत 20 राऊंड फायर केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार थांबवला. या चकमकीत कोणीही जखमी झाले नाही.

सप्टेंबरच्या सुरुवातीला पूंछ जिह्यात अशीच चकमक झाली तेव्हा काही घुसखोर हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. बालाकोट सेक्टरमधील सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला होता. मात्र हिंदुस्थानी सैनिकांनी पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.