
दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. केंद्रीय मिठागर मंत्रालयाने आपली जमीन या महामार्गासाठी राज्य सरकारला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे महामार्गाचे काम सुकर झाले आहे. पुढील तीन वर्षांत हा मार्ग तयार झाल्यानंतर नरीमन पॉइंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडमार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे.
दहिसर ते भाईंदर महामार्गासाठी आवश्यक जमीन मिळवण्याच्या हेतूने मागील चार-पाच वर्षांपासून केंद्रीय मिठागर मंत्रालय व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. या पाठपुराव्याला यश आले असून दहिसर-भाईंदर 60 मीटर रस्त्यातील 53.17 एकर जागा केंद्रीय मिठागर मंत्रालयाने राज्य सरकारच्या माध्यमातून मीरा- भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याची मान्यता दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोड हा उत्तनपर्यंत येणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा 60 मीटर रुंदीचा रस्ता मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत येऊन तिथून वसई, विरार या दोन शहरांना जोडला जाणार आहे. या रस्त्याची निविदा प्रक्रिया यापूर्वीच काढली आहे. हे काम एल अॅण्ड टी ही कंपनी करणार असून पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी येणारा तीन हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे.