नवरात्र दिवस दुसरा – ब्रम्हचरिणी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवण्याचे काय महत्त्व आहे? वाचा

आज नवरात्राची दुसरी माळ असून, दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची महती, मंत्र, महत्त्व यांविषयी जाणून घेऊया. कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ज्ञात आहे.

ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.

ब्रह्मचारिणी देवीचे पूजन व मंत्र
सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे. ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे म्हटले जाते. तसेच पूजनानंतर यथाशक्ती, यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते.

ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

ब्रह्मचारिणी देवीची महती
ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न-पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले. सर्व देवतांनी आणि ऋषी, मुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते. ब्रम्हचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते.

आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये ब्रम्हचर्याचे गुण जागृत होऊ लागतात.आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते,जो आपला मूळ स्वभाव आहे. आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेंव्हाच आपण शूर,निडर,पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो.