
आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे जाळे जगभर पसरले आहे. ग्रोक आणि Gemini यांसारख्या AIवर आधारित चॅटबॉटने अक्षरश: धुमाकूळ घातलाय. राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा प्रत्येक्ष क्षेत्रातील माहिती क्षणार्धात उपलब्ध होतेय. कामादरम्यान पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी एआय चॅटबॉट्सचा वापर केला जातो. असाच एआयचा योग्य वापर करून एक महिला करोडपती झाली आहे. बातमी आश्चर्यचकीत करणारी असली तरी हे सत्य आहे.
आज तक या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेतील व्हर्जिनियामधील मिडलोथियन शहरात घडली. मिडलोथियनची रहिवासी असलेल्या कॅरी एडवर्ड्सने वर्जीनिया लॉटरी पावरबॉल हा खेळ खेळत असताना चॅटजपीटीची मदत घेतली. यावेळी तिने लॉटरी जिंकण्यासाठी हवा असलेला नंबर चॅटजीपीटीला विचारला. नेहमीप्रमाणे एआयने त्याचे उत्तर दिले आणि कॅरीचे नशीब फळफळले. Chatgptने सांगितलेल्या नंबरची लॉटरी कॅरीला लागली. यातून तिने दीड लाख डॉलर म्हणजे 1.32 कोटी रुपये जिंकले.
कॅरी एडवर्ड्सने याबाबत प्रतिक्रिया दिली की, एडवर्ड्स म्हणाली की लॉटरीचे तिकीट खरेदी केल्यानंतर दोन दिवसांनी ती एका मिटिंगसाठी गेली होती. तेव्हा तिला तिच्या फोनवर “कृपया तुमचे बक्षीस घ्या.” असा एक मॅसेज आला. सुरुवातीला तिला वाटले की हा फ्रॉड मॅसेजही असू शकतो. पण जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला खरं काय ते समजलं असे तिने सांगितले.
सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे एडवर्ड्सने तिला मिळालेल्या या रकमेचे संपूर्ण दान करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅरिच्या पतीचे ज्या आजाराने निधन झाले त्यावर रिसर्च करणारी संस्था असोसिएशन फॉर फ्रंटोटेम्पोरल डीजनरेशन (AFTD); उपासमारीशी लढणारी संस्था शालोम फार्म्स; आणि अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणारी संस्था नेव्ही-मरीन कॉर्प्स रिलीफ सोसायटी, या तीन संस्थांना कॅरी बक्षीस मिळालेले लॉटरीचे पैसे दान कऱणार आहे.