Latur Rain News – जिल्ह्यात 30 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी धास्तावले आहेत. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. दररोजच्या पावसाने नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. अनेकांना यामध्ये आपला जीवही गमवावा लागला आहे. सोयाबीन, ऊस, मुग, उडीद, कापूस याचे मातेरे झाले आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

सोमवारी (22 सप्टेंबर 2025) लातूर शहरात दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील मौजे तांदुळजा येथे सायंकाळी विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस एक तासापासून चालू आहे. औराद शहाजानी येथे विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस दुपारी एक वाजल्यापासून ते 2.30 पर्यंत 64 मि.मी. पडल्याची नोंद झाली आहे. औराद शहाजानी सह शेळगी, ताडमुगळी, मानेजवळगा, बोरसुरी, सावरी, तगरखेडा, हालसी (तु.), हलगरा, होसुर या सह संपूर्ण तालुक्यातील सर्व महसुल मंडळात सर्वदूर अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे अनेक परिसरातील ओढे आणि नाल्यांना सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हाताशी आलेली लाखो हेक्टर पिके जवळपास आठ दिवसांपासुन पाण्याखाली बुडालेली आहेत. त्यामुळे शंभर टक्के नुकसान गृहीत धरून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. वडवळ नागनाथ परिसरात मागील अर्ध्या तासापासून रिमझिम पाऊस सुरू आहे. हाळी व परिसरात जवळपास 1 तासांपासून मोठा पाऊस आहे. अहमदपुर तालूक्यात व परिसरात परत मुसळधार पाऊस चालू झाला आहे .

सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही.