अमेरिकन विनोदी कलाकार जिमी किमेल पुन्हा परत येतोय, चार्ली कर्कवरील टिप्पणीनंतर शो करण्यात आला होता बंद

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांच्या हत्येवरील टिप्पणीनंतर किमेलचा शो निलंबित करण्यात आला. शो बंद केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आता तो पुन्हा परत येणार आहे. या घटनेने अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र आणि एक रूढीवादी कार्यकर्ते चार्ली कर्क यांची (१० सप्टेंबर) हत्या झाली होती. युटा व्हॅली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. (१६ सप्टेंबर) किमेलने त्यांच्या “जिम किमेल लाईव्ह” या शोमध्ये कर्कच्या हत्येवर भाष्य केले होते. त्यांने असे म्हटले की, ही हत्या राजकीय फायद्यासाठी करण्यात आली आहे.

एफसीसी (फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन) चे अध्यक्ष ब्रेंडन कार यांनी एबीसीला किमेलविरुद्ध कारवाई न केल्यास नेटवर्कच्या परवान्याविरुद्ध कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर, एबीसीने दबावाखाली येऊन किमेलचा शो अनिश्चित काळासाठी स्थगित केला होता.

जिमी किमेलचा शो रद्द केल्यानंतर, डिस्नेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपनीचे बाजार मूल्य सुमारे ४ अब्ज डॉलर्सने घसरले. जाहिरातदार आणि संघटनांनी बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. यानंतर, डिस्ने आणि किमेल यांच्यातील वाटाघाटींमुळे हा निर्णय घेण्यात आला. परंतु किमेलच्या शोच्या परतीच्या अटी अद्याप अस्पष्ट आहेत. किमेलचा करार मे २०२६ मध्ये संपत आहे आणि तो निवृत्तीचा विचार करत आहे.