
परतीच्या पावसाने मराठवाड्यात धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. बंधारे तुडुंब भरल्याने प्रकल्प साठ्यात मोठी आवक सुरू आहे. सर्वच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे, माजलगाव प्रकल्पाचे अकरा, मांजराचे सात, अप्पर कुंडलिकाचे तीन दरवाजे उघडे आहेत, पाचव्यांदा बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अनेक नद्यांना आज सकाळीही उधाण आले आहे. जिल्ह्यात असंख्य पूल पाण्याखाली आहेत, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
जिल्ह्यातील जवळपास 500 गावांतील जनजीवन ठप्प झाले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिंधफणा नदीच्या पुरामुळे 20 गावं प्रभावित झाली आहेत. माजलगाव तालुक्यातील सात गावांना सध्या पुराच्या पाण्याने वेढले आहे.
बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला असून प्रलयकारक परिस्थिती उद्भवली आहे. पुराच्या पाण्याच्या धास्तीने नागरिक भयभीत आहेत. एनडीआरएफचे पथक मदतकार्य करीत आहे. अतिवृष्टीने अनेक विक्रम मोडित काढले आहेत. शहागडच्या पुलाला गोदावरीचे पाणी लागले आहे. गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वांजरा, मांजरा, अमृता, कडा, कडी, सिना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे.
माजलगावच्या धरणामधून 97 हजार क्युसेसने पाणी अकरा दरवाजातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मांजरा प्रकल्पातूनही तब्बल 55 हजार क्युसेस पाणी सहा दरवाजातून सोडण्यात आले आहे. ढालेगाव उच्च दर्जाच्या बॅरेजमध्ये पाण्याची प्रचंड आवक निर्माण झाल्याने या बॅरेजसचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 3 लाख 80 हजार क्युसेसने पाणी गोदावरीमध्ये सोडण्यात येत आहे. महापुराच्या थैमानाने बीड जिल्ह्यात शेती भुईसपाट झाली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक पूल वाहून गेले आहेत. रस्ते खोदून निघाले आहेत. शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. भयंकर पूरपरिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
5 लाख हेक्टर भुईसपाट
अतिवृष्टीच्या कहरने बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे डोळे आता पाणावले आहेत. निसर्गाने हाततोंडाशी आलेला घासच नाही तर अख्ख ताट हिसकावून घेतलं आहे. तब्बल 5 लाख हेक्टरवरील खरीप हंगाम उद्धवस्त झाला आहे. अजूनही शेतामध्ये ढोपराएवढे पाणी आहे. शेती खरडून निघाली आहे. माती वाहून गेली आहे. बांध फुटले आहेत, 50 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक गावांत पुराच्या पाण्यात नागरिक अडकले आहेत.
57 महसूल मंडळात अतिवृष्टी
गेल्या चोवीस तासामध्ये बीड जिल्ह्यातील 57 महसूल मंडळाला पावसाने झोडपले आहे. बीड जिल्ह्यामध्ये चोवीस तासात विक्रमी पाऊस झाला. बीड जिल्ह्याची वार्षिक सरासरी सप्टेंबरपर्यंत 566 मिमीची आहे. या तुलनेत प्रत्यक्षात यंदा 780 मिमी पाऊस झाला आहे. सरासरी 137.6 टक्के पाऊस झाला आहे.