सामना अग्रलेख – भ्रष्टाचाराचे कुरण, मुंबई महापालिकेत अनागोंदी!

भाजपला लोकांची पर्वा नाही. स्थानिक मराठी माणसांची तर अजिबात पर्वा नाही. भाजपला मुंबईत ‘बिल्डर राज’ आणायचे आहे. मुंबईतील सर्व मराठी संस्कृती जपणाऱ्या संस्था भाजपवाले मोडायला निघाले आहेत. भाजपमुळे आता या शहराचा श्वास गुदमरला आहे. हे सर्व थांबवायचे सोडून हे लोक पुढील काळात भ्रष्टाचार थांबवू म्हणतात. मग गेल्या तीन वर्षांतला भ्रष्टाचार कोणत्या होमहवनात नष्ट करणार आहात? भाजपला मुंबईची पुरती वाट लावायची आहे. शंभर उंदीर खाऊन हे बोके अयोध्येला निघाले आहेत. धन्य आहे त्यांची!

गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून मुंबई महापालिकेत भाजपपुरस्कृत ‘प्रशासन राज’ आहे. मुख्यमंत्री फडणवीस सांगतील ती पूर्व दिशा अशी स्थिती आहे. या काळात मुंबईत ठेकेदारांचे राज्य अवतरले. मुंबईची संपूर्ण लूट झाली. हे असे चित्र असताना मुंबई भाजप अध्यक्ष साटम यांनी सांगितले की, पुढील तीन वर्षांत मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त होईल. हे महाशय उद्याची बात करतात, पण आज आणि काल झालेल्या लुटीचे काय? मागची तीन वर्षे मुंबई महापालिका कोणी आणि कशी लुटली याचा हिशेब आधी द्या. मुंबई महापालिकेवर शिवसेना असताना आर्थिक शिस्त होती. त्यामुळेच सर्व खर्च वजा करून साधारण 90 हजार कोटींच्या ठेवी पालिकेच्या खात्यावर शिल्लक राहिल्या, पण पालिकेवर मिंधे-फडणवीसांचे राज्य आल्यानंतर साधारण अडीच हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडून उधळपट्टी करण्यात आली. महापालिकेच्या फिक्स डिपॉझिट मोडून कारभार चालवणे हाच भ्रष्टाचार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन वगैरे देण्यासाठी मुदत ठेवी मोडल्या. शिवसेनेने ही पुंजी राखून ठेवली म्हणून भाजप त्यावर आज उड्या मारीत आहे. महापालिकेच्या मुदत ठेवी मोडून त्यातील साधारण साडेनऊशे कोटी रुपये एमएमआरडीए या बाजारबसवीला देण्याचा नादानपणा याच काळात घडला आणि भाजपवाले पुढील तीन वर्षांत मुंबई भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार करीत आहेत. पालिकेतील भ्रष्टाचाराचा विषय निघाला म्हणून सांगायचे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिकेच्या भूखंडाचे वाटप ज्या पद्धतीने लाडक्या बिल्डरांना केले तो इतिहासातील मोठा भ्रष्टाचार आहे. महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी राखीव असलेला जुहू येथील 800 कोटींचा भूखंड भाजपने त्यांच्या लाडक्या बिल्डरला बेकायदेशीरपणे दिला. महापालिका कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी राखीव असलेल्या जुहूतल्या भूखंडासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी

काय काय उपद्व्याप

केले व महादेव रिअ‍ॅल्टीजला तो कसा द्यायला लावला याचा खुलासा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या व्यवहारात मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीला शेकडो कोटींना चुना लावला. गुन्हेगारी स्वरूपाचे हे कारस्थान ‘आज’ मुंबई पालिकेत घडले असताना भाजपवाले पुढच्या तीन वर्षांचा भ्रष्टाचार साफ करायला निघाले आहेत. नगरविकास मंत्री असलेल्या ‘मिंधे’ यांनी अडीच लाख कोटींची कामे परस्पर काढून ‘ठेकेदारांना’ दिली व त्या बदल्यात 25 टक्के कमिशन वसूल केले. या कामांची कोणतीही खबर मुंबई महापालिकेला नाही. या व्यवहारास फडणवीस-मिंध्यांचा वेगवान, गतिमान विकास म्हणावे काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत व प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेसह सर्व संस्थांची लूट करायची. त्याच लुटीतून उद्याच्या निवडणुका लढवायच्या हे यांचे धोरण दिसते. मुंबईतील नालेसफाई, रस्ते काँक्रिटीकरण, घन कचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार झाला आहे. यंदाच्या पावसात मुंबई कशी तुंबली व लोकांचे कसे हाल झाले ते काय भाजपच्या या लोकांनी पाहिले नाही? यांना भ्रष्ट मार्गाने मुंबई महापालिकेवर ताबा ठेवायचा आहे व त्यासाठीच त्यांनी धारावीसारखे पुनर्वसन प्रकल्प पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांना दिले. धारावी प्रकल्पात अदानी यांच्यावर विशेष सवलतींचा वर्षाव पालिकेने केला तो थक्क करणारा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबईत मेट्रोच्या नावाखाली ‘आरे’त प्रचंड जंगलतोड झाली. नाले, गटारे यावर भरणी टाकून इमारती उभ्या राहिल्या. मुंबईतील शेकडो एकरची कांदळवने भराव टाकून बिल्डरांना दिली जात असताना सध्याची भाजपपुरस्कृत मुंबई महानगरपालिका झोपा काढते आहे काय? मुंबई पालिकेतले

‘प्रशासक राज’ म्हणजे

भाजप आणि मिंधे महामंडळाचे चराऊ कुरण बनले आहे. फडणवीस यांनी नेमलेले ‘आयुक्त’ म्हणजे प्रशासकही त्यामुळे पूर्ण ‘मिंधे’ बनले आहेत. तसे नसते तर त्यांनी डोळ्यांसमोर सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर राजमान्यतेची मोहोर उठवली नसती. बाराशे कोटींचा भ्रष्टाचार रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झाला व त्या सौंदर्यीकरणाचे खड्डेच खड्डे सर्वत्र दिसत आहेत. इथून तिथून गोळा केलेल्या माजी नगरसेवक मंडळींना ‘उ.मु.’ मिंधे हे खिरापतीसारखा निधी वाटतात. त्या पैशांचा हिशेब नाही. कामे होत नाहीत, पण बिले मात्र निघत आहेत. कामे झाली नाहीत, पण निधी कोणाच्या तरी खिशात गेला. हा उघड भ्रष्टाचार आहे. याची चौकशी करायची म्हटले तर ‘व्हिजिलन्स’ खात्यातही यांच्याच माणसांचा भरणा. म्हणजे चोरच चोरांची चौकशी करणार. पालिकेच्या कुपर रुग्णालयातही अनागोंदी सुरू आहे. बाळंतिणींच्या वॉर्डात उंदीर, घुशी, भटकी कुत्री फिरत आहेत. मे.जे.एम. एन्फ्रा आणि एव्हिरो कंपनीला याच पालिका प्रशासनाने बेकायदेशीरपणे सांडपाणी प्रक्रिया कामाचे कंत्राट मंजूर केले व याच कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे पालिकेला सादर केली. या कंपनीचा सूत्रधार हा भाजपचा मुंबईतील पदाधिकारी आहे. त्यामुळे मुंबई पालिकेची हजारो कोटींची लूट झाली. हा भ्रष्टाचार चाटून खाणारे भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करतात. भाजपला लोकांची पर्वा नाही. स्थानिक मराठी माणसांची तर अजिबात पर्वा नाही. भाजपला मुंबईत ‘बिल्डर राज’ आणायचे आहे. मुंबईतील सर्व मराठी संस्कृती जपणाऱ्या संस्था भाजपवाले मोडायला निघाले आहेत. भाजपमुळे आता या शहराचा श्वास गुदमरला आहे. हे सर्व थांबवायचे सोडून हे लोक पुढील काळात भ्रष्टाचार थांबवू म्हणतात. मग गेल्या तीन वर्षांतला भ्रष्टाचार कोणत्या होमहवनात नष्ट करणार आहात? भाजपला मुंबईची पुरती वाट लावायची आहे. शंभर उंदीर खाऊन हे बोके अयोध्येला निघाले आहेत. धन्य आहे त्यांची!