युद्धासाठी रशियाला हिंदुस्थान आणि चीनचे फंडिंग, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचा आरोप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतच हिंदुस्थान व चीनला लक्ष्य केले. ‘हिंदुस्थान आणि चीन रशियाला युद्धासाठी आर्थिक रसद पुरवत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. दुसऱ्यांदा अध्यक्षपदी आल्यानंतर ट्रम्प यांचे संयुक्त राष्ट्रसंघातील हे पहिलेच भाषण होते. या भाषणात त्यांनी अमेरिकेचे गोडवे गातानाच हिंदुस्थान, चीन व रशियावर दुगाण्या झाडल्या. ‘युक्रेनविरुद्धचे युद्ध रशियासाठी चांगले नाही. त्यामुळे रशियाची प्रतिमा खराब होत आहे. हिंदुस्थान आणि चीन रशियाला मदत करत आहेत. ’नाटो’ देशांनीही रशियाशी पूर्णपणे संबंध संपवलेले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

’रशिया युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही तर अमेरिका पुन्हा जबर टॅरिफ लावू शकते. मात्र हे निर्बंध परिणामकारक ठरण्यासाठी युरोपीयन देशांनी आम्हाला साथ द्यायला हवी. त्यांनी रशियाकडून तेल आणि वायू खरेदी पूर्णपणे व तात्काळ थांबवायला हवी, असे ट्रम्प म्हणाले.’ जगात शांतता नांदावी अशी ज्या कोणत्या देशाची इच्छा असेल त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी मी आलो आहे, असेही त्यांनी सांगितले.

हा अमेरिकेचा सुवर्णकाळ

’वर्षभरापूर्वी अमेरिका मोठया संकटात होती. मी सत्तेत आल्यानंतर अवघ्या 8 महिन्यांत अमेरिका जगातील सर्वात आकर्षक देश झाला आहे. त्या बाबतीत जगातील कोणताही देश आमच्या आसपासही नाही. अमेरिकेचा सध्या सुवर्णकाळ सुरू आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.

पॅरासिटामॉल गर्भवतींसाठी धोकादायक – ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. ’टायलेनॉल किंवा पॅरासिटामॉल या टॅबलेटचा वापर गर्भवती महिलांनी मर्यादित प्रमाणात करावा. कारण हे औषध धोकादायक असून यामुळे होणाया मुलाला ऑटिझमचा आजार होऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केला. अमेरिकन सरकारच्या आरोग्य सचिवांनी या संदर्भात संशोधन केल्याचे सांगत ट्रम्प यांनी हा दावा केला. जगभरातील वैद्यकीय तज्ञांनी व संशोधकांनी ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. सर्वसाधारणपणे ताप, वेदना किंवा अन्य छोटया-मोठया त्रासासाठी गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल दिले जाते. ते अधिक सुरक्षित असल्याचे डॉक्टर मानतात. मात्र ट्रम्प यांनी नेमका याच्या उलट दावा केला आहे.

‘युनो’चे काम काय?

ट्रम्प यांनी यावेळी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ’जगातील सात देशांची युद्धे मी थांबवली. युनोने यात मला काहीही मदत केली नाही. त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही. साधा फोन कॉल केला नाही. युनोचे नेमके काम काय आहे,’ असा सवालही त्यांनी केला. ’ही संघटना नुसती कडक शब्दांत पत्र लिहिते, पण पुढे काहीच करत नाही. अशा पोकळ शब्दांनी युद्ध थांबत नाहीत,’ असे ट्रम्प यांनी सुनावले.