
अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महायुती सरकारला लगावला. केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अस्मानी संकटामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने आता पंचनामे आणि नियम तपासण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे पैसे तत्काळ जमा करा आणि नंतर शहानिशा करत बसा. तसेच त्या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये, यासाठी निर्देश द्यावेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत द्या
आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड, लातूर, धाराशीव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिह्यांमध्ये शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेले आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्याने पाहिली नव्हती. काही वर्षांपूर्वी धाराशीव भागात एकदा गारपीट झाली होती. पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिके डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत. त्यामुळे जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टरपर्यंत मदत द्या, अशी मागणी करतानाच, ओल्या दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा, असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला आहे.
जमीन वाहून गेल्याने रब्बी पिकं धोक्यात आली आहेत. गुरेढोरे वाहून गेली, रस्ते वाहून गेलेत. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला होता. तेव्हादेखील केंद्राने अतिशय तुटपुंजी मदत दिली होती, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
ऑनलाईन सल्ले काय देता, प्रत्यक्ष बांधावर जा
शेतकरी संकटात असतानाही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात टाळाटाळ करणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. अद्ययावत एआयच्या मदतीने काम करा, असा सल्ला सरकार शेतकऱ्यांना देते. पण नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाईन सल्ले देत आहेत. सरकारमधील एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. साधं हेलिकॉप्टरनेसुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि डीसीएम यांना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्हीसमोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणे सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टीसंदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.