
कर्जत तालुक्यातील टेंबरे आंबिवली येथील रिव्हॉव्हाइल्ड सेंच्युरी अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या फार्महाऊसमधून महागडे विदेशी पक्षी चोरीस गेले होते. पक्षी घेऊन उडालेले चोरटे तामिळनाडूत पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले. कर्जत पोलिसांनी चेन्नई येथे दोन चोरट्यांना अटक करून अफ्रिकन ग्रे पॅरेट, ब्लू गोल्ड मकाव, स्कार्लेट मकाव या पक्ष्यांसह १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
चोरट्यांनी १६ जुलै रोजी पहाटे फार्महाऊसचे लोखंडी जाळे तोडून विदेशी पक्षी व उपकरणे पळवली होती. यामध्ये ९ आफ्रिकन ग्रे पॅरेट, २ ब्ल्यू गोल्ड मकाव, १ स्कार्लेट मकाव अशा १२ विदेशी पक्ष्यांसह काही महागडी उपकरणेही चोरून नेली होती. पक्षी घेऊन आरोपी तामिळनाडूत पळून गेल्याची खबर पोलिसांना लागताच पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे पथक चेन्नईत धडकले. एका ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी अनिल जाधव (२९, रा. वडवळ, ता. खालापूर, जि. रायगड) आणि राजेशसिंग माही उर्फ संमशेरसिंग (रा. महिम पश्चिम, साईनाथ चौक, दिल्ली) यांना पकडले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले विदेशी पक्षी व साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या पथकातील राहुल वरोटे, किरण नवले, सुशांत वरक, समीर भोईर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.