
भोसरीतील आळंदी रस्त्यावरील ‘कै. श्री. ज्ञानेश्वर सोपानराव गवळी वाहनतळा’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन तीन महिने झाले. मात्र, हा चारमजली वाहनतळ सुरू करण्यास महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येऊ लागली आहे. त्यामुळे भोसरी आळंदी रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील हा पहिला चारमजली वाहनतळ आहे. महापालिकेच्या ‘इ’ प्रभाग स्थापत्य विभागाद्वारे या वास्तूचे काम डिसेंबर २०२४मध्ये पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जूनमध्ये वाहनतळाचे उद्घाटनही झाले. भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ वसली आहे. त्यातच या रस्त्यावर विविध विक्रेत्यांनीहातगाड्या लावल्या आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. पूर्वी महापालिका आणि भोसरी वाहतूक विभागाद्वारे या रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन केले होते. मात्र, काही काळानंतर अंमलबजावणी होऊ शकली नाही. या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी कै. सखूबाई गवळी प्रवेशद्वारासमोरील जागेत महापालिकेने चारमजली ‘कै. श्री. ज्ञानेश्वर सोपानराव गवळी वाहनतळ’ उभारला आहे. या वाहनतळात दीडशे दुचाकींबरोबरच ७५ चारचाकी वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत.
आळंदी रस्ता भागात महापालिका आणि भोसरी पोलीस वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंगचे नियोजन केले होते. तसे फलकही लावण्यात आले; पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. ग्राहक आणि व्यावसायिक दुकानांसमोरच वाहने उभी करतात. याचा रहदारीस अडथळा होऊन परिसरात नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. येथील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी कै. सखूबाई गवळी प्रवेशद्वारासमोरील जागेत महापालिकेने चारमजली वाहनतळ उभारला. भाडेनिश्चितीचा प्रस्ताव महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाद्वारे नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र, नगररचना विभागाने भाडेनिश्चिती केल्यानंतर तत्काळ निविदा काढण्याचे भूमी व जिंदगी विभागाचे प्रयत्न असणार आहेत. दरम्यान, उद्घाटनानंतरही वाहनतळ सुरू न झाल्याने तेथे बकालपणा वाढत आहे. बाहनतळाच्या प्रवेशद्वारासमोरच कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. अंतर्गत भागातही अस्वच्छता वाढली आहे.
भोसरीतील चार मजली वाहनतळाच्या भाडेनिश्चितीसाठीचा नगररचना विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दर निश्चित होताच तत्काळ निविदा काढण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच वाहनतळ नागरिकांसाठी खुले करण्यात येईल.
सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी व जिंदगी विभाग