
अतिवृष्टीने बीड जिल्ह्याला झोडपून काढले. पूर परिस्थिती निर्माण झाली. पिके, शेत पाण्यात बुडाले. पिके वाहून गेली, शेती खरडून निघाली. जमिनीत मातीऐवजी शेवाळ राहिले. शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर असताना सरकारने धीर आणि दिलासा देण्याऐवजी हतबल शेतकर्यांची चेष्टा करण्याचे काम केले. नुकसान लाखोचे आणि सरकारची मदत सात-आठ हजार टिकल्यांची. यामुळे अचानक शेतकर्यांमध्ये संताप झाला आणि जरूड फाट्यावर ठिय्या मांडत आक्रोश व्यक्त केला.
अतिवृष्टी आणि पुराने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून शेतकर्यांना मोठी अपेक्षा होती. सरकार मदतीचा हात देईल, असा विश्वास असताना राज्य सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली. सात हजार रुपये देवून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याने बळीराजा संतप्त झाला आहे. असंख्य गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून आक्रोश व्यक्त केला. जरूड फाट्यावर निदर्शने करत हजारो शेतकर्यांनी प्रशासनाला जाब विचारला. हेक्टरी ५० हजार रूपये तातडीने मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी द्या, कांद्याच्या पिकाला वेगळी नुकसान भरपाई द्या, अशा मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिले.