अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, त्यांना तातडीची मदत मिळावी व कर्जमाफी व्हावी; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत मिळावी व कर्जमाफी व्हावी, अशी मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधीमंडळ पक्षनेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आपल्या मागण्यांची दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करतील आणि घोषणांच्या पुढे जाऊन मदत करतील, अशी आशाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतातील मातीच वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे जवळपास ५० टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. ही परिस्थिती अत्यंत दुःखद आहे आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Latur Flood – भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फडणवीसांचा पाहणी दौरा! शेतकऱ्यांची निवेदने न स्वीकारताच निघून गेले

आपण आपल्या भाषणात, राज्यातील जनतेला योग्य वेळ येताच कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता ती वेळ आलेली आहे, आणि राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे. आधी झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे जवळपास 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. या थकबाकीचे वितरण लवकरात लवकर करण्याचीही अत्यंत आवश्यकता आहे. 2,339 कोटी रुपयांच्या निधीला केवळ मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात मदतीचे वितरण करण्यासाठी बराच कालावधी लागेल. या परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत पुरवण्यासाठी आणि योग्य वेळेत त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

टेम्पो परत घेऊन जा, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांचा संताप; शिंदे, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले

राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झालेले असल्यामुळे नियमांनुसार पंचनाम्याची आवश्यकता नाही. सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत देणे, हे आपले कर्तव्य आहे. ज्याप्रकारचे नुकसान झालेले आहे त्याप्रमाणे व कुठल्याही प्रकारचे निकषांमध्ये न अडकता शेतकऱ्यांना अपेक्षित आणि गरजेची असलेली मदत तात्काळ करण्यात यावी.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्वरित आणि प्रभावी पावले उचलावीत, जेणेकरून त्यांना योग्य वेळी मदत मिळू शकेल आणि त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल, असे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.