
दिल्लीतील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 32 विद्यार्थिनी व महिलांनी बाबाविरोधात तक्रार केली होती. त्यापैकी 17 जणींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. प्रकरण उघडकीस आल्यापासून चैतन्यानंद फरार आहे.
चैतन्यानंद हा दिल्लीच्या वसंत कुंज येथील दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग ऍण्ड मॅनेजमेंटचा माजी संचालक आहे. लोकांमध्ये त्याने स्वतःची प्रतिमा अध्यात्मिक गुरू अशी निर्माण केली होती. गेल्या 16 वर्षांपासून तो महिलांचा छळ करायचा. तब्बल 50 मुलींच्या मोबाईलवर चैतन्यानंदने केलेले अश्लील मेसेज आढळले आहेत. कधी आमिष दाखवून तर कधी धमक्या देऊन तो तरुणींचा लैंगिक छळ करायचा. 2009 आणि 2016 साली त्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली होती. मात्र कारवाई न झाल्याने त्याचे धाडस वाढले होते. चैतन्यानंदच्या या कृत्यांमध्ये आश्रमातील तीन महिला वॉर्डनचा सहभाग होता, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.