
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2025 पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. मात्र अभ्यासक्रमात बदल झाल्यानंतर राज्य सेवा पूर्वपरीक्षा पहिल्यांदाच 28 सप्टेंबरला होणार आहे. मात्र या परीक्षेवर पावसाचे सावट आहे. परीक्षा तोंडावर आली असतानाच राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्य सेवा परीक्षेची नव्या पद्धतीनुसार तयारी करत आहेत. राज्यभरातून लाखो उमेदवार परीक्षा देणार आहेत. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्य सेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. परंतु आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे जाहिरात येण्यास विलंब झाला आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. अखेर आयोगाने 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आणि त्यानंतर आता 28 सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे.
विद्यार्थ्यांचे म्हणणे काय?
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, मराठवाडा परिसरात गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यास साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे तसेच केंद्रांवर वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे. त्या अनुषंगाने मराठवाडय़ासह विदर्भ, नागपूरच्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे की, राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल.
एमपीएससीचे म्हणणे
यासंदर्भात एमपीएससीमधील काही अधिकाऱयांशी चर्चा केली असता राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याशिवाय परीक्षेची तारीख तूर्तास बदलता येणार नाही अशी माहिती दिली. त्यामुळे राज्य सरकारने पूरपरिस्थितीचा अंदाज घेता परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केल्यास परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.