कांदिवलीत सिलिंडर गॅस गळतीने आगीचा भडका, सात महिला गंभीर जखमी; प्रकृती चिंताजनक

कांदिवली पूर्वमधील किसन मेस्त्री चाळीमध्ये आज सकाळी भीषण सिलिंडर स्फोट होऊन सात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. शिवानी कॅटर्समध्ये गॅस लिकेजनंतर आगीचा भडका उडाल्याने ही दुर्घटना घडली.

कांदिवली पूर्वमध्ये मिलिटरी रोडवर ही किसन मेस्त्री चाळ आहे. या ठिकाणी ग्राऊंड प्लस 1 मजला असलेल्या गाळ्यामध्ये सकाळी 9.05 वाजता अचानक गॅस गळती सुरू होऊन आगीची ठिणगी पडली. या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्याला सुरुवात केली. मात्र या ठिकाणी वीजजोडणी, गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, गॅस स्टोव्ह असल्याने आगीची तीव्रता वाढली. या ठिकाणी सात महिला अन्नपदार्थ बनवण्याचे काम करीत होते. हे सर्वजण या आगीत 80 टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. त्यांच्यावर सुरुवातीला ईएसआयसी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ऐरोली बर्न हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आणि बोरिवलीच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

जखमींची नावे

शिवानी गांधी, नितू गुप्ता, जानकी गुप्ता, मनराम कुमाकट, रसिका जोशी, दुर्गा गुप्ता, पूनम.

शिवसेना मदतीला धावली

सिलिंडर स्फोटाची माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला दुर्घटनेची माहिती देण्यात आली. शिवाय जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी मदत करण्यात आली. शिवाय परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी कांदिवली पूर्व विधानसभा निरीक्षक नंदू मोरे, शाखाप्रमुख प्रकाश शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.