
तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे, पण दादागिरीला आम्ही घाबरणार नाही. तुमच्या माजी आमदारांना तुम्ही भरपूर निधी दिला, पण तरीही कामे झाली नाहीत. त्यांनी तो निधी स्वतःच्या विकासासाठी वापरला आहे. तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्या, अशा शब्दात शिवसेना आमदार महेश सावंत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक मंगळवारी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिह्याचे पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे होते. या बैठकीला आमदार सचिन अहिर, कालिदास कोळंबकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, पालिका आयुक्त भूषण गगरानी, जिल्हाधिकारी आंचल गोयल आदी उपस्थित होते.
मी आमदार नसूनही मला वीस कोटी रुपयांचा निधी मिळतो असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केले होते. त्यावरून महेश सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले. तुमच्या माजी आमदारांना समज द्या. त्यांना कानमंत्र द्या, असा सल्लाही महेश सावंत यांनी यावेळी शिंदेंना दिला त्यांनी दादर-माहीम विभागातील समस्या मांडल्या. मुंबईतील महत्त्वाच्या पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी त्यांनी केली.
मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी गारगाई प्रकल्प मार्गी लावा
काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी दक्षिण मुंबईशी संबंधित विषय मांडले. म्हाडाच्या दुरुस्ती मंडळात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामावर परिणाम होतो. अभियत्यांवरही कामाचा बोजा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या गारगाई धरणाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून लवकर परवानग्या घ्या आणि प्रकल्प मार्गी लावून मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटवा अशी मागणी केली. त्यावर केंद्र सरकारकडून परवानग्या येत असल्याचे पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी सांगितले. दक्षिण मुंबईत पंचवीस वर्षांपूर्वी बांधलेला भंडारवाडा येथे पालिकेचा जलाशय आहे. या जलाशयातून 110 दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरवठा होणे अपेक्षित होते. पण या भागातील नागरी वस्ती वाढली तरी सरासरी 97 ते 98 दशलक्ष लिटर्स पुरवठा होतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. उमरखाडी येथे वीस इमारतींचा समूह विकास प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची मागणीही अमिन पटेल यांनी यावेळी केली.





























































