
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा दुसरा बॉम्ब टाकल्यानंतर निवडणूक आयोग वठणीवर आला आहे. मतदारयादीत नाव ऑनलाइन जोडण्याची व वगळण्याची प्रक्रिया सुधारण्याचा प्रयत्न आयोगाने सुरू केला आहे. त्यासाठी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर बंधनकारक केला आहे. ही मतदार यादीतील गोंधळाची आडून आडून कबुलीच आहे.
कर्नाटकातील आलंद व महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून हजारो नावे काढण्यासाठी व जोडण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा कसा गैरवापर करण्यात आला याचे प्रात्यक्षिकच राहुल यांनी पुराव्यासह दाखवले होते. त्यावर निवडणूक आयोगाकडे कसलेही उत्तर नव्हते. पहिल्या पत्रकार परिषदेनंतर राहुल यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागणाऱया आयोगाने आता त्रुटी दुरुस्त करण्याचा मार्ग पत्करला.
नवे ई-साईन फिचर
आयोगाच्या ऑनलाइन पोर्टल किंवा ऍपमध्ये नवे ई-साइन फिचर समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार अर्जदाराचे नाव आधार कार्डवरील नावाशी जुळायला हवे. तसेच, अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक वापरला जाईल तो आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.
पुरावे कधी देताय?
मतदार नोंदणी आणि मतदारांची नावे वगळण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेत निवडणूक आयोगाने बदल केल्यानंतर राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सणसणीत टोला हाणला आहे. ‘आम्ही चोरी पकडली तेव्हा तुम्हाला टाळा लावायची आठवण झाली. आता चोरांनाही पकडाल. सीआयडीला पुरावे कधी देताय ते सांगा,’ असे राहुल यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सुनावले.