अकरावी प्रवेशासाठी आता शेवटची संधी; आता 25 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी घेऊ शकणार प्रवेश

अकरावीसाठी राज्यात पहिल्यादांच राबविण्यात आलेल्या केंद्रिय प्रवेशप्रक्रियेत पुन्हा एकदा विशेष फेरी आयोजित करण्यात आली असून, प्रवेशासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्यापि प्रवेश न घेतलेले विद्यार्थी आता 25 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. अहिल्यानगर जिह्यात विविध व्यवस्थापनांच्या सुमारे 30 हजारांहून अधिक जागा जवळपास रिक्त असल्याचे दिसत असून, या ठिकाणी आतापर्यंत अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

दरम्यान, नव्याने दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीत अकरावीत प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी हे अकरावी प्रवेशाला मुकणार आहेत. शैक्षणिक 2025-26 या वर्षाकरिता अकरावी प्रवेशप्रक्रियेत संपूर्ण राज्यात 14 लाख 85 हजार 686पैकी 13 लाख 43 हजार 969 विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दोन्ही भाग भरले. त्यांपैकी 13 लाख 33 हजार 893 विद्यार्थ्यांनी त्यांचे महाविद्यालयात प्रवेश निश्चित केले. यानंतरही अद्यापि काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत असे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षण विभागाने विशेष फेऱ्या राबविल्यानंतर पुन्हा शेवटच्या विशेष फेरीचे आयोजन केले आहे. त्यासाठी 25 सप्टेंबर अंतिम मुदत आहे. विद्यार्थी 25 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेऊन अंतिम संधीचा लाभ घेऊ शकणार आहेत. या विशेष फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, याकरिता शिक्षण विभागाने पुन्हा एकदा विशेष फेरीचे नियोजन केले आहे. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या फेरीचा लाभ घेऊन प्रवेश निश्चित करावेत.

अहिल्यानगर जिह्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 454 उच्च माध्यमिक विद्यालयाची शिक्षण विभागाकडे नोंदणी झालेली असून, यात कला विभागाच्या 32 हजार 480, विज्ञान विभागाच्या 49 हजार 770, तर वाणिज्य विभागाच्या 16 हजार 340 जागा मंजूर आहेत. या ठिकाणी यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये कला विभागात 13 हजार 636, वाणिज्य विभागात सहा हजार 537 आणि विज्ञान विभागात 33 हजार 691 प्रवेश झालेले आहेत. जिह्यात शाखानिहाय मंजूर जागा आणि अकरावीचे आतापर्यंत झालेले प्रवेश यात 30 हजारांहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबतची अंतिम आकडेवारी संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्पष्ट होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

…तर विद्यार्थी अकरावीला मुकणार!

राज्यात पहिल्यांदा राबविण्यात आलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेशप्रक्रियेमुळे यंदा अकरावीच्या शैक्षणिक वर्षास उशीर झालेला आहे. जिह्यात शासकीय आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये विविध व्यवस्थापनांच्या 98 हजार ते 1 लाखाच्या जवळपास जागा शिल्लक होत्या. दहावीतील 63 हजार विद्यार्थी पास झालेले होते. यांतील अनेक विद्यार्थी आयटीआयसह अन्य पदविका यांना प्रवेश घेत असल्याने दहावीतील सर्वच्या सर्व विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेणार नाहीत. मात्र, या प्रक्रियेत एकही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही, यासाठी शिक्षण विभागाने प्रवेशासाठी शेवटची संधी उपलब्ध करून दिल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.