शिर्डीतून तीन पिस्तुलांसह साडेसात लाखांचा ऐवज जप्त; दोन आरोपी श्रीरामपूर पोलिसांच्या जाळ्यात

श्रीरामपूर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन इसमांना अटक करून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, एक मोटार, असा एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. बबन ऊर्फ इर्शाद आजिज शाह (वय 25, रा. काशिवाबा रोड, बाबुपुरा चौक, श्रीरामपूर) व नदीमखान साबीरखान मणियार (वय 30, रा. नागर रोड, चाळीसगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक केलेल्या दोघांकडून 3 गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन व मोटार जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत हे दोन्ही आरोपी शस्त्र्ासाठा व गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या तपासानुसार दोन्ही आरोपींवर यापूर्वी श्रीरामपूरसह चाळीसगाव येथे जबरी चोरी, लूटमार, मारहाण, अवैध शस्त्र्ा बाळगणे अशा विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारवाईनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघमारे, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, निरीक्षक रवींद्र देशमुख, सचिन बनसोडे, अनिल शिंदे, रमेश तेलंग, नितीन शेलार, अनज येशेर तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

दरम्यान, नागरिकांना परिसरात काही संशयास्पद हालचाली, अवैध शस्त्र्ासाठा किंवा गुन्हेगारी होत असल्याची माहिती मिळाल्यास ती त्वरित पोलिसांना कळवावी. ज्यामुळे गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक वाघमारे यांनी केले आहे.