सोलापूरात पुरात पिके वाहून गेली; बार्शीतील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

suicide

सोलापूर जिह्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील पिके वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद भागवत गंभीर, लक्ष्मण काशिनाथ गवसाने अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहे. पिकांसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. पुराच्या पाण्याने शेती उद्ध्वस्त झाली असून, दोघेही कर्जफेडीच्या तणावात होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास सात मंत्री आज पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जिह्यात आले असताना दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्हय़ात झालेली अतिवृष्टी आणि सीना-भीमासह बार्शी तालुक्यातील भोगावती, नागझरी व चांदणी या नद्यांना महापूर आल्याने या नदीकाठच्या शेतांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात असून, कारी येथे राहणारे शरद भागवत गंभीर (वय 39) या शेतकऱ्याने घराजवळ गळफास लावून आत्महत्या केली.

पुरामुळे शेतातील पीक वाहून गेली असून, शेती खर्चासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे? या चिंतेत ते दोन दिवसांपासून होते. पांगरी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे. दुसरी घटना दहिटणे येथे घडली असून, लक्ष्मण काशिनाथ गवसाने या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सोलापूर जिल्हय़ातील जवळपास तीन लाख शेतकरी अतिवृष्टी व महापुरामुळे संकटात सापडले आहेत. अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल बनले असून, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व अर्धा डझन मंत्री सोलापुरात असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संताप व्यक्त होत आहे.