
जमिनीच्या व्यवहारासाठी न्यायालयाचे बनावट शिक्के बनवून फसवणूक करणाऱ्या वकिलापाठोपाठ आणखी दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद सलीम शेख (४२) व मोहम्मद मुमताज हुसेन (३२) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मायनर दाखला बनवण्यासाठी लागणारे न्यायालयाचे बनावट शिक्के या दोघांनी अॅड. व्ही. के. शर्मा यांना बनवून दिल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या दोघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
वाशी सेक्टर-१७, उलवे येथील बांधकाम व्यावसायिक लाधवजी पटेल (५७) यांना जमीन खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी न्यायालयातून मायनर दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्जही केला होता. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने पटेल यांनी परिचयातील सागर घरत याच्या मदतीने वकिलामार्फत मायनर दाखला बनवून त्याची प्रत जमीन खरेदी व्यवहारात जोडली. दरम्यान पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. ई. कोठळीकर यांनी जमीन खरेदी व्यवहारातील कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांना दाखल्यावरील सही व शिक्के खोटे असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी अॅड. शर्मा याला अटक केली होती. त्याची चौकशी केली असता त्याने मुंबईतील सलीम आणि मुमताज या दोघांकडून हे बनावट शिक्के बनवल्याचे समोर येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
अपंग व्यक्तीला नोटीस
मोहम्मद सलीम शेख आणि मोहम्मद मुमताज हुसेन या दोघांना जेरबंद करून पोलिसांनी खाक्या दाखवताच त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी हे शिक्के एका अपंग व्यक्तीकडून बनवून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी अपंग व्यक्तीला नोटीस बजावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार यांनी दिली.