
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूकी आधीच राज्यातील तब्बल 75 लाख महिलांना दहा हजार रुपये देणार आहेत. महिलांना एखादा उद्योग सुरू करता यावा यासाठी हे पैसे देण्यात येणार असून गरजेनुसार भविष्यात आम्ही दोन लाखांपर्यंतची मदत करू असे जाहीर करण्यात आले आहे.
प्रशांत भूषण यांनी याबाबतची बातमी X वर शेअर करत मोदी सरकावर टीका केली. ”ही तर बिहार निवडणुकीपूर्वी महिलांना उघडपणे दिलेली लाचच आहे. ही एक अत्यंत भ्रष्ट पद्धत आहे”, असे प्रशांत भूषण यांनी ट्विट केले आहे.
शुक्रवारी 26 सप्टेंबरला या योजनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून मोदी थेट दिल्लीवरून महिलांना पैसे पाठवणार असल्याचे समजते. त्यावरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे देणार
मुख्यमंत्री महिला रोजगार योजने अंतर्गत महिलांना दिले जाणारे दहा हजार हे त्यांना एखादा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी दिले जाणार आहेत. त्यासाठी एकूण 7500 कोटींचा निधी देण्यात आला आहे. दहा हजार रुपये वापरून सदर महिला त्यांचा व्यवसाय सुरू करणार असून पुढे त्यांच्या प्रगतीनुसार सरकारकडून त्यांना व्यवसायवाढीसाठी दोन लाखापर्यंतची मदत केली जाणार आहे.