राज्य सहकारी बँकेची घोडदौड सुरूच, 651 कोटींचा नफा; घसघशीत लाभांश जाहीर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची घोडदौड सुरूच असून आर्थिक वर्षे 2024-25मध्ये कंपनीने 651 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. त्या पार्श्वभूमीवर बँकेने भागधारकांना दिवाळीआधीच खूशखबर देत 10 टक्के लाभांश जाहीर केला आहे.

राज्य सहकारी बँकेची 114 वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी या वेळी बँकेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच या वेळी यूपीआय ऍक्वायरर व अर्ली वाॅर्निंग सिग्नल सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. देशातील राज्य व जिल्हा बँकांमध्ये ही सुविधा देणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही पहिलीच बँक ठरली आहे. अर्ली वाॅर्निंग सिग्नल सिस्टीममुळे कर्ज खात्यांवर व संभाव्य गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

सर्व सहकारी संस्थांचा नीट समन्वय साधला तर अर्बन बँका, जिल्हा बँका, संस्था यांच्याकडे सरकारपेक्षा दुप्पट पैसे आहेत. फक्त प्लॅनिंग नसते. ही विषमता जाऊन सहकार सर्व स्तरावर मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, मुख्य सरव्यवस्थापक अशोक माने उपस्थित होते.

प्रशासकांच्या अभिनंदनाचा ठराव

राज्य बँकेस प्रथमच आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानक (आयएसओ) प्रमाणपत्र मिळाले असून लेखापरीक्षणात सलग 13 वेळा ‘अ’ वर्ग प्राप्त केला आहे. त्याबद्दल उपस्थित सभासदांनी विद्याधर अनास्कर यांच्यासह प्रशासक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. राज्य सहकारी बँक यापुढेही अशीच प्रगती करत राहील, असा विश्वास या वेळी अनास्कर यांनी व्यक्त केला.