डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक झटका, औषधांवर 100 टक्के टॅरिफ; 1 ऑक्टोबरपासून नवा टॅक्स लादणार…

जोपर्यंत औषधे विकणारी कंपनी अमेरिकेत स्वतःचा कारखाना सुरू करत नाही, तोपर्यंत टॅरिफ आकारला जाणार. कंपनीच्या प्लँटची उभारणी सुरू झालेली असेल म्हणजे बांधकाम सुरू आहे असे समजले जाईल. जर काम सुरू झालेले असेल, तर त्या औषधी निर्माण कंपन्यांच्या उत्पादनांवर कोणताही टॅरिफ असणार नाही.

हिंदुस्थानातून अमेरिकेत आयात होणाऱया वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ, एच-1 बी व्हिसा शुल्क एक लाख डॉलर अशा जाचक अटी लादणाऱया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक झटका दिला आहे. अमेरिकेत आयात होणाऱया औषधांवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली असून 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणीही होणार आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला 30 टक्के औषधे निर्यात करणाऱया हिंदुस्थानच्या फार्मा सेक्टरला बसणार आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘टथ’ या सोशलमीडियावर या संबंधीची घोषणा करताना ‘अमेरिका फर्स्ट’ची भूमिका मांडली आहे. अमेरिकेत आयात होणाऱया ब्रॅडेड किंवा पेटंट असलेल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टसवर 100 टक्के कर लावण्यात येईल. 1 ऑक्टोबरपासून हा कर लादू. जर फार्मा कंपनीने अमेरिकेत कारखाना सुरू केला तर हा कर लावला जाणार नाही. मात्र विदेशात कारखाना सुरू करून औषधांची आयात अमेरिकेत केली जात असेल तर त्या औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत ज्या औषधांची आयात केली जाते त्यात तब्बल 30 टक्के वाटा हिंदुस्थानचा आहे. ट्रम्प यांच्या 100 टक्के टॅरिफमुळे हिंदुस्थानातील फार्मा कंपन्यांवर थेट परिणाम होणार आहे. कंपन्यांची निर्यात कमी होईल. पर्यायाने सरकारचाही महसूल कमी होणार आहे.

गेल्या सहा महिन्यांत हिंदुस्थानातून 3.7 अब्ज डॉलर्सची निर्यात

2024 मध्ये हिंदुस्थानातून अमेरिकेत केलेली औषध निर्यात 3.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 31 हजार 626 कोटी रुपये होती, तर 2025 च्या पहिल्या सहामाहीत 3.7 अब्ज डॉलर म्हणजेच 32 हजार 5050 कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. हिंदुस्थानातील फार्मा कंपन्या डॉ. रेड्डीज, सन फार्मा, लुपिन आणि ऑरोबिंडोला मिळणाऱया नफ्यात 40 ते 50 टक्के वाटा हा एकटय़ा अमेरिकेचा आहे.

 ट्रम्प यांच्या घोषणेनंतर शेअर बाजार गडगडला. फार्मा सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अरविंदो, लुपिन, डीआरएल, सन फार्मा आणि बायोकॉनला फटका बसला. सन फार्माचे शेअर्स 3.8 टक्क्यांनी घसरून 1,580 वर पोहोचले. सिप्लाचे शेअर्सही घसरले.

जेनेरिक औषधांना सूट

हिंदुस्थानातून जाणाऱया जेनेरिक औषधांना मात्र या करातून सूट देण्यात आली आहे. हिंदुस्थान हा अमेरिकेला जेनेरिक औषधांची निर्यात करणारा सर्कात मोठा निर्यातदार देश आहे. 2024 मध्ये हिंदुस्थानने अमेरिकेला अंदाजे 8.73 अब्ज डॉलर म्हणजे 77 हजार कोटी रुपये किमतीची औषधे निर्यात केली.

किचन आणि बाथरूमलाही नाही सोडले

ट्रम्प यांनी औषधांशिवाय किचनमधील वस्तूंवरही 50 टक्के टॅरिफ लावला आहे. बाथरूम प्रोडक्टसवर 50 टक्के, लक्झरी फर्निचरवर 30 टक्के आणि मोठय़ा ट्रकवर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत बनवल्या जाणाऱ्या ट्रक कंपन्यांना फायदा होईल, असे ट्रम्प यांनी म्हटलेय. ट्रकमुळे अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत आहे, असे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.