
>> भावेश ब्राह्मणकर
जागतिक वारसा स्थळ असलेल्या अभयारण्यात जंगल वाढत असल्याने मोठीच चिंता निर्माण झाली आहे. हे असे का घडते आहे? वनविभाग आणि तज्ञ विचारात का पडले आहेत? या प्रश्नांचा, निर्माण झालेल्या स्थितीचा घेतलेला वेध.
सर्वसाधारणपणे झाडे तोडली जातात किंवा जंगल नष्ट होते म्हणून चिंता व्यक्त होते. कारण, पर्यावरणाच्या दृष्टीने ती बाब नकारात्मक असते. मात्र, अभयारण्यात जंगल वाढत असल्याने चिंता करण्यासारखी स्थिती आहे, असे कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल? पण ही वस्तुस्थिती आहे. आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यान हे जागतिक वारसा स्थळ आहे. आणि या ठिकाणी वृक्षराजी वाढत असल्याने उद्यानाचे रूपांतर जंगलात होत आहे. ही बाब तेथील वन्यजीवांसाठी अडचणीची ठरत आहे.
हवामान बदलासह विविध कारणांमुळे गेल्या तीन दशकांत मानस राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पातील गवताळ प्रदेश जवळजवळ 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. नैसर्गिक प्रक्रिया पाहता गवताळ प्रदेश कमी होऊन जंगल वाढणे यास 100 वर्षांहून अधिक काळ लागतो. मात्र, मानस राष्ट्रीय उद्यानात अवघ्या 30 वर्षांत ही प्रक्रिया झाली असल्याने ती चिंतेची बाब आहे, असे मानस राष्ट्रीय उद्यान (एमएनपी) आणि व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सी. रमेश सांगतात. गवत कमी होत असल्याने शाकाहारी प्राण्यांची संख्या कमी होत आहे. गवताळ प्रदेशात वावरणारी परिसंस्था वेगळी असते आणि जंगलात निर्माण होणारी परिसंस्था भिन्न असते. इतक्या कमी कालावधीत एवढा मोठा बदल घडणे हे नैसर्गिक नक्कीच नाही. येथील जैविक विविधतेवर विपरीत परिणाम घडून येत आहे. त्यामुळे जागतिक वारसा असलेले हे स्थळ चिंतेचे कारण बनत आहे.
गवताळ प्रदेशांची जागा घेणारी झाडे आणि झुडुपे स्थानिक प्रजातींची आहेत. गवताळ प्रदेशांची जागा जंगलांनी घेतल्याने गवत असलेल्या भागात शाकाहारी प्राणी केंद्रित होत आहेत. हरणांसारखे प्राणी हे गवत खाण्यासाठी उद्यानाभोवती फिरतात. आता ते उपलब्ध गवताळ प्रदेशातच एकवटत आहेत. यामुळे जे वन्यजीव हरणांवर जगतात त्यांची मोठीच अडचण होत आहे. विशेष म्हणजे, मानस राष्ट्रीय उद्यानातील गवताळ प्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अद्वितीय आहे. कारण हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे एकाच अधिवासात मोठे एकशिंगी गेंडे, दलदलीचे हरण, हॉग डिअर, पिग्मी हॉग, जंगली म्हैस, बंगाल फ्लोरिकन, वाघ आणि हत्ती एकत्र राहतात.
पर्यावरण अभ्यासक आणि गवताळ प्रदेश तज्ञ मानस राष्ट्रीय उद्यानातील या बदलाविषयी खूपच चिंता व्यक्त करतात. जैविक आणि अजैविक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे होणारा हा बदल दुर्लक्ष करण्यासारखा नाही, तर तो गांभीर्याने घेण्याचा आहे. तज्ञांच्या मते, जैविक प्रक्रियेत, आक्रमक प्रजातींच्या प्रसारासह गवताळ प्रदेश हळूहळू झुडुपाच्या जमिनीत रूपांतरित होतो. त्यामुळे जंगल विकसित होते. हवामान बदलामुळे आक्रमक प्रजातींचा प्रसार वेगवान होत आहे. उद्यानाच्या भोवती होणारा मानवी हस्तक्षेप परिणाम करतो आहे. विविध कारणांमुळे गवत कमी होत आहे. गेल्या काही वर्षांत तर येथील गवतांची विविधताही कमी होत चालल्याचे निरीक्षण तज्ञ नोंदवत आहेत. जैविक बाबींचा विविध अंगाने अभ्यास करणे आवश्यक आहे. जर एखाद्या विशिष्ट प्रजातीच्या गवताची संख्या कमी झाली तर त्या गवतावर अवलंबून असलेल्या प्राण्यांवर त्याचा निश्चित परिणाम होतो. हे असेच सुरू राहिले तर हे प्राणी हळूहळू उद्यानातून नाहीसे होतील. विशेष म्हणजे हे नैसर्गिक नाही तर अनैसर्गिक आहे. मानवी हस्तक्षेपामुळे अशा प्रकारचा मोठा बदल घडून येणे भूषणावह नक्कीच नाही. नद्यांना येणारे पूर हे उप-हिमालयीन गवताळ प्रदेशाच्या देखभाल आणि व्यवस्थापनात मोठय़ा प्रमाणात महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु मानस राष्ट्रीय उद्यानासारख्या भागात सहसा सतत पूर येत नाहीत. त्यामुळे गवताळ प्रदेश कमी होण्यास पूर कारणीभूत ठरत नाही.
हवामान बदलामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येत आहेत किंवा त्यांची तीव्रता आणि संख्या वाढत आहे. मात्र गवताळ प्रदेशाच्या जागी जंगल तयार होत असल्याच्या प्रकाराबद्दल कुठेच, काहीच बोलले जात नाही. हवामान बदलामुळे पाऊस अनियमित झाला आहे. याचा परिणाम हळूहळू गवताळ प्रदेशाच्या गतिशीलतेवर होत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने मातीच्या रचनेत बदल होत आहे. मातीतील घटक बदलले की गवतांच्या अस्तित्वावर परिणाम होतो. शिकार रोखणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देणे यावर सरकारी पातळीवर भर दिला जात आहे. मात्र, अधिवास टिकवून ठेवणे आणि त्यात वाढ करणे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गुवाहाटी विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक मीनाक्षी बोरा सांगतात की, हवामान बदलामुळे या उद्यानाच्या गवताळ प्रदेशातील समुदायात बदल होत आहे. ज्यामुळे क्रोमोलेना ओडोराटा आणि मिकानिया मायक्रांथा यासारख्या आक्रमक प्रजाती वाढू शकतात.
गवताळ प्रदेश कमी झाला की त्यावर जगणारे शाकाहारी प्राणी कमी होतात. शाकाहारी प्राण्यांची शिकार करणाऱया वन्यप्राण्यांना भक्ष्य मिळत नाही. परिणामी भक्ष्याच्या शोधार्थ वन्यजीव इतरत्र भटकतात. यातूनच मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होतो. सहज भक्ष्य मिळाले नाही तर अनेकदा मानवालाही वन्यजीव लक्ष्य करतात. यामुळे प्रश्न जटील होत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बिबटय़ांचा प्रश्न अतिशय उग्र आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये हत्तींचाही प्रादुर्भाव आहे. आता आसाममध्ये जागतिक वारसा स्थळ अशा प्रकारे धोक्यात येणे हे केवळ हवामान बदलावर खापर फोडून चालणार नाही. त्याच्या जोडीला मानवाचा हस्तक्षेपही आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संकटांचा विशेषत्वाने विचार करणे गरजेचे आहे. तसेच, यासंदर्भात बहुविध अंगाने अभ्यास तसेच संशोधनही व्हायला हवे. तेव्हाच हे बदल, त्यांचा वेग आणि कारणे समोर येतील. तसेच, यासंदर्भात कुठली उपाययोजना करायची हेसुद्धा निश्चित करता येईल. त्यामुळे पर्यावरणीय प्रश्नांकडे अधिक सजग पाहण्याची दृष्टी आपल्याला विकसित करावी लागेल.
(लेखक पर्यावरण अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)