उद्याची शेती – डेटा ते उत्पादन एआयचा परिणाम

>> रितेश पोपळघट

शेतीतील यांत्रिकीकरण ते कौशल्य आधारित शेती प्रयोगांची माहिती, शेतीविषयक स्टार्टअप, शेती सहकारातील मॉडेल्स अशा विविध माहितींवर आधारित हे सदर.

भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी साधन म्हणून उदयास येत आहे. AI च्या मदतीने पिकांचे नियोजन, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, हवामानाचा अंदाज आणि भविष्यात बाजारपेठेतील मागणी याबाबत अचूक व तत्काळ माहिती मिळू शकते.

तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे ऊस पिकावर मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केलेला प्रयोग खूप बोलका आहे. या प्रकल्पाची मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनीही प्रशंसा केली आहे. या प्रयोगातून असे दिसून आले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे पाणी, खते यांचा वापर योग्य होऊन उत्पादनात वाढ होत असल्याचे प्राथमिकदृष्टय़ा दिसून आले आहे. सांगलीमधील गन्ना मास्टर या कंपनीच्या माध्यमातून ऊस पिकात 2020 सालापासून अनेक तंत्रज्ञान समूहांना सोबत घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान आधारित प्रयोग केले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रचंड प्रमाणात डेटा अत्यंत कमी वेळात आणि अचूकपणे विश्लेषण करण्याची क्षमता यात असते. आधुनिक तंत्रज्ञान जसे की, उपग्रह नकाशे , भौगोलिक स्थान प्रणाली, मातीतील ओलावा आणि तापमान मोजणारे सेन्सर व ड्रोन तंत्रज्ञान यांच्या मदतीने शेतातील प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवता येते.

उदाहरण दाखल आपण पाहिले तर एखाद्या पिकाच्या पानावर कीड किंवा रोगाची सुरुवात होताच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अॅप लगेचच त्याची माहिती शेतकऱयाला देतो आणि त्यावर नेमका उपाय काय करायचा हे सुचवते. यामुळे मोठय़ा नुकसानीपासून बचाव होतो. सिंचनासाठी आवश्यक पाण्याचे प्रमाण, खतांचा योग्य डोस आणि हवामानातील बदलांनुसार पीक व्यवस्थापन करणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सोपे होते. जगातील इस्रायल, नेदरलँड्ससारख्या देशांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडवली आहे. आता हे तंत्रज्ञान उसासाठीच नाही, तर केळी, डाळिंब, द्राक्षे, आंबा, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला यांसारख्या अनेक पिकांसाठीही वापरता येऊ शकेल. सातारा पाडेगाव येथील कृषिपदवीधर शेतकरी अजित कोरडे हे टोमॅटो या भाजीपाला पिकासाठी हे तंत्रज्ञान वापरत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची अचूक माहिती मिळवता येते, ज्यामुळे खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. भारतीय शेतकरी त्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करू शकतात आणि त्यांचा खर्च कमी करू शकतात असे चित्र सध्या तरी आहे.

ठिबक सिंचनाचा अभाव हा एक मोठा अडथळा आहे. कारण ठिबक सिंचनाशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पाणी व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणे कठीण आहे. अनेक शेतकऱयांचे ठिबक सिंचनासाठीचे अर्ज प्रलंबित आहेत आणि अनुदानाची रक्कम अनेक वर्षांपासून थकीत आहे. यामुळे ठिबक सिंचनाचा वापर वाढवणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अंमलबजावणीसाठी एक पूर्वअट आहे. याव्यतिरिक्त, सदर प्रणाली बसवण्याचा आणि तिचा वार्षिक देखभाल खर्च लहान व मध्यम शेतकऱयांसाठी खूप जास्त असू शकतो. त्यामुळे एकत्रित शेती मॉडेल म्हणजे ज्या एका भागातील 50 शेतकरी एकत्र येऊन हे तंत्रज्ञान वापरतील हा एक व्यवहार्य पर्याय असू शकतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेची एक मर्यादा म्हणजे ते मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या मोजू शकत नाही, जे जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच वन्य प्राण्यांमुळे या महागडय़ा उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता असते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वी वापर करण्यासाठी शेतकऱयांनी आधी शास्त्राrय पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी अजूनही योग्य बियाण्यांची निवड, लागवडीचे अंतर, खत आणि सिंचन व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत गोष्टींमध्ये मागे आहेत.

ऑस्ट्रेलियात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कापूस शेती करण्यापूर्वी शेतकऱयांना 6 महिने प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते प्रणाली प्रभावीपणे वापरू शकतील. अशाप्रकारे याला केवळ एक साधन म्हणून पाहणे आवश्यक आहे, जादूची कांडी म्हणून नाही. काही शेतकऱयांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्तेशिवायसुद्धा केवळ पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर उत्तम उत्पादन घेता येते. उदाहरणार्थ काही शेतकरी केवळ मातीतील ओलावा मोजणारे सेन्सर आणि स्वयंचलित हवामान केंद्र वापरून चांगले उत्पादन घेत आहेत. त्यामुळे कृत्रिम आणि नैसर्गिक बुद्धिमत्तेचे सुवर्ण संयोजन करणे आवश्यक आहे. ही मैत्री विचारांची नामक एक शेतकरी समूह असून वेळोवेळी कृषी क्षेत्रातील बदलांबाबत चर्चा करत असतो. या समूहातील शेतकरी chatgpt आणि जेमिनीसारखे टूल्स वापर करून शेतीत अनेक बदल घडवत आहेत. सोबत त्याबाबतची माहिती शेतकरी वर्गाला शेअर करत आहेत.

महाराष्ट्र सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात Ai साठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे, हे एक सकारात्मक पाऊल आहे, पण त्याचा वापर सुयोग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. फक्त संघटित पिकांवर काम न करता इतर शेतकरी वर्गाला कम्युनिटी मॉडेलच्या माध्यमातून कशी मदत होईल हे बघणे महत्त्वाचे असेल. शेतकऱयांनी हे तंत्रज्ञान स्वीकारताना अजिबात घाई करू नये. प्रायोगिक पातळीवर यशस्वी उदाहरणे पाहून, खर्च-फायदा ताळेबंद मांडून आणि स्वतच्या परिस्थितीनुसारच याचा अवलंब करावा. रेल्वे, ट्रक्टर आणि मोबाईलप्रमाणे सुरुवातीला हे तंत्रज्ञान अजून तेवढे प्रभावी दिसत नसल्याने थोडे जड वाटेल, पण काळानुसार शेतकरी याच्या वापरात माहीर होतील तिथून पुढे भारतीय शेतीत एक नवा अध्याय सुरू होईले.
(लेखक ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक तथा
मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

भारतातील आव्हाने आणि मर्यादा याचा विचार केला असता भारतात विशेषत ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना काही गंभीर आव्हाने आहेत. महत्त्वाचे आव्हान म्हणजे भारतीय उष्णकटिबंधीय हवामान, जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यांसारख्या स्थानिक परिस्थितीनुसार सदर प्रणालीमध्ये आवश्यक बदल करणे. प्रत्येक प्रदेशातील जमिनीचे गुणधर्म आणि हवामान वेगवेगळे असल्यामुळे एका ठिकाणी यशस्वी झालेली प्रणाली दुसऱया ठिकाणी तशीच काम करेल असे नाही. दुसरे मोठे आव्हान म्हणजे तांत्रिक ज्ञान आणि पायाभूत सुविधांचा अभाव. भारतातील बहुसंख्य शेतकऱयांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा मर्यादित आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप्स अत्यंत सोपे आणि वापरण्यास सोपे असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी, वीजपुरवठय़ाची अनिश्चितता आणि अतिवृष्टी किंवा पूरस्थितीत सेन्सर प्रणालींचा मर्यादित उपयोग हीसुद्धा प्रमुख आव्हाने आहेत.
[email protected]