
निलंगा तालुक्यातील माचरटवाडी येथे शुक्रवार (26 सप्टेंबर 2025) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने मोठा कहर केला. यामुळे माचरटवाडी परिसरातील अनेक एकर उस संपूर्ण भुईसपाट झाला आहे. या अस्मानी संकटामुळे येथील शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्ता कोलमडून गेला आहे.
पावसाच्या तडाख्यामुळे आधीच सोयबीन पीकावर पाणी फिरलं आहे. अशातच आता शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने संपूर्ण उस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हाताश होऊन कोलमडून गेला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून उसासोबत सोयाबीन, तुर, उडीद, मुग ही सर्व पीके पाण्यात वाहून गेली आहेत. शेतकरी बांधव उसाच्या पिकावर इतर काही देवाणघेवाण करून आपला उदरनिर्वाह भागवण्याचे काम करत असतो. मात्र कालच्या झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण उसाचे क्षेत्र भुईसपाट झाल्यामुळे येथील शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. त्यांना आता मदतीची गरज आहे. तहसीलदार, तलाठी, अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.