
भोकरदन तालुक्यातील दहाही मंडळात शनिवारी (27 सप्टेंबर 2025) दुपारी चार पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर थैमान घातलं. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभं पीक आडवं झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच शहरातील काही ठिकाणी रहिवाशी भागातील घरांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भोकरदन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना रस्त्यावर असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे सर्वच दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जवळपास लाखो रुपयांचा फटका या पावसामुळे दुकान मालकांना बसला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील राजुर, हसनाबाद, पिंपळगाव रेणुका, सिपोरा बाजार, धावडा, अन्वा, आव्हाणा, केदारखेडा, जानेफळ दाभाडीसह भोकरदन भागातही मुसळधार पाऊस कोसळल्याने मका, सोयाबीन, कपाशी, तुरीसह अद्रक पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना पावसाचा जबर फटका बसला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.