जायकवाडीचे सर्व दरवाजे 8 फूटांनी वर, पैठणमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने धरणाचे सर्व 27 दरवाजे प्रत्येकी 8 फूटांनी वर करण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला नाथसागर जलाशयात 2 लाख 73 हजार 432 क्सुयेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातून गोदापात्रात तब्बल 2 लाख 26 हजार 638 क्सुयेक पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. नदीचा फुगवटा वाढल्याने शहरातील सखल लोकवस्त्यांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आज (28 सप्टेंबर 2025) 27 कुटुंबातील 492 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

जायकवाडी धरणातून 2 लाख 26 हजार 638 क्युसेक प्रमाणे जलविसर्ग सुरू झाल्याने शहरात पुरस्थियी निर्माण झाली आहे. नाथमंदीराच्या मागील दशक्रिया विधीचे (मोक्षघाट) ठिकाण पूर्णपणे पाण्यात गेले आहे. पंडित गागाभट्ट चौकातून पुराचे पाणी ‘राजपूत भवन’, जैन स्कूल व जुना नगर रोड परिसरात पोहोचले आहे. पाटेगाव पुलाच्या काठोकाठ पाणी आल्याने पोलिस प्रशासनाने बॅरेकेट्स लाऊन शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) कडे जाणारा मार्ग बंद झाला असून पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटला आहे. सखल भागातील संतनगर व कहारगल्ली भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासाठी अभिनंदन मंगल कार्यालय व व श्रीनाथ हायस्कूल ताब्यात घेऊन ‘पुरग्रस्त निवारा केंद्र’ बनवण्यात आले आहे. 27 कुटुंबातील 492 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत स्थलांतराची प्रक्रिया सुरू होती.

Nanded News – आम्ही जगायचे की मरायचे ते सांगा; लोकप्रतिनिधींना फटकारत शेतकऱ्यांचा सामूहिक जलसमाधीचा प्रयत्न

आज सकाळी नाथसागरात पाण्याची आवक वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी परिस्थिती पाहून आपत्कालीन 9 दरवाजे उघडण्याचे आदेश दिले. हे संकटकालीन दरवाजे महिनाभरात तिसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी शहरात भोंग्यांद्वारे सावधगिरीचा इशारा दिला. मच्छीमार समाजाच्या सहकार्याने जिवरक्षक व होड्यांची उपलब्धता केली, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.