पालिका निवडणुकीत शिंदे गटाशी युती नको, स्वबळावर लढू! नवी मुंबईत भाजपचा नारा

शिंदे गटाने गेल्या तीन वर्षांत फार त्रास दिला आहे. प्रभागातील विकासकामांमध्ये नेहमीच आडकाठी आणली आहे. त्यामुळे आगामी नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाशी युती नको, आपण स्वबळावर लढू, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यक्त केली. माजी नगरसेवकांनी या बैठकीत स्वबळाचा नारा दिल्याने भाजप आणि शिंदे गटात आता पुन्हा नवा वाद उभा राहिला आहे.

शहरातील विविध प्रभागात सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची निवडणूक शिंदे गटाशी युती करून लढण्यास कडाडून विरोध केला. महापालिका आयुक्तांकडून आमची कामे केली जात नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावामुळे पालिका प्रशासन आमची नेहमीच अडवणूक करीत आहेत. शिंदे गटाच्या लोकांची कामे कोणतेही आढेवेढे न घेता मार्गी लावली जात आहेत, असा आरोपही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी करून स्वबळावर निवडणूक लढवा, अशी मागणी यावेळी नाईक यांच्याकडे केली.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
शिंदे गटाकडून होत असलेल्या छळवणुकीसंदर्भात येत्या आठ दिवसांत भाजपच्या माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ वर्षा निवासस्थानी जाऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार करणार आहे. विकासकामात होत असलेल्या पक्षपातीपणामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्याची भूमिकाही यावेळी जाहीर केली आहे, असे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

शिंदे गट-भाजप वाद विकोपाला
वनमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता भाजपच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादाचा जोरदार फटका पालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांना बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.