
शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा, असा सल्ला भाजपकडून देण्यात येत आहे, त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड मत व्यक्त करत आम्हाला भाजपच्या उधारीच्या सल्ल्यांची गरज नाही, असे स्पष्ट शब्दांत भाजपला सुनावले आहे. तसेच हा मेळावा राज्याला राजकारणाची नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऑनलाईन दसरा मेळावा घ्यावा, असे सल्ले भाजपने आम्हाला देण्याची गरज नाही. याआधाही अशा संकट काळात, अतिवृष्टीतही मेळावे झाले आहेत. या मेळाव्यातून राज्यातील राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्यातील पूरपरिस्थितीबाबत भाष्य केले जाईल. हा मेळावा महाराष्ट्रासाठी, राज्यातील जनतेसाठी आहे. आम्हाला भाजपकडून उधारीचे ज्ञान घेण्याची गरज नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना किती मदत केली, हे प्रफुल्ल पटेल यांना चांगले माहित असायला हवे. तेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता. त्यावेळी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. हे पटेल यांना माहिती नसले तर त्यांनी विड्या वळत बसावे. त्यांचा तो खानदानी मोठा व्यवसाय आहे. आपण त्यांचा अपमान करत नाही, पण हे त्यांना माहिती असायला हवे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीची आजही शेतकरी आठवण काढत आहेत, आम्हाला तशीच कर्जमाफी द्या, अशी त्यांची मागणी आहे. हे पटेल यांना माहिती नसेल तर ते कोणत्या जगात वावरत आहेत, गेल्या पाच वर्षातील राज्यातील राजकारणाची त्यांना माहिती आहे काय? असा सवालही त्यांनी केला.