
तमिळचा सुपरस्टार थलपती विजय यांच्या करुर पक्षाच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 40 वर पोहोचली असून 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा चर्चेचा विषय बनला आहे. अशातच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थलपती विजय यांना फोन करुन या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी थलपती विजय याला फोन करुन त्याच्याशी संवाद साधल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. विजय यांच्या जाहीर सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त करत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शनिवारी संध्याकाळी करूर येथे विजय यांची रॅली झाली. यावेळी थलपती विजय रॅलीला सात तास उशिरा पोहोचले होते. दहा हजार लोकांची क्षमता असलेल्या ठिकाणी सुमारे तीस हजार लोक जमले होते.
दरम्यान विजयच्या भाषणादरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला आणि नंतर आणखी एकाचा मृत्यू झाला. गृहमंत्रालयाने या प्रकरणावर तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागितला आहे. दरम्यान मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली एक पॅनेल स्थापन केले आहे.