दिबांचे नाव नाही तर विमानतळाचे उ‌द्घाटन नाही; 6 ऑक्टोबरला भूमिपुत्रांचे आंदोलन

दि. बा. पाटील यांचे नाव न देताच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्याचा घाट सुरू आहे. यावरून रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी संताप व्यक्त केला असून दिबांचे नाव नाही तर विमानतळाचे उद्घाटन नाही, असा पवित्रा घेतला आहे. यासाठी ६ ऑक्टोबरला रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करण्याचा इशारा खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा यांनी दिला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने केली जात आहेत. मात्र केंद्राकडून अजून अंतिम अधिसूचना काढली जात नाही. त्याचवेळी दुसरीकडे ८ किंवा ९ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संताप व्यक्त होत असून ६ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पाच लाख नागरिक सहभागी होणार
आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांनी कोपरखैरणे येथील शेतकरी समाजमंदिरमध्ये बैठक घेऊन रणनीती आखली. त्यावेळी सुरेश म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले या आंदोलनात पाच लाख आंदोलक सहभागी होतील. केंद्राने जर उद्घाटनाआधी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव जाहीर केले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, सत्कार करू. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा त्यांनी दिला.