
कोट्यवधी रुपये खर्चुन ठाण्याला स्मार्ट सिटी बनवल्याची टिमकी वाजवणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या कारभाराची पोल खोल झाली आहे. पालिकेने कोपरी-पाचपाखाडीत बांधलेल्या महिलांच्या सार्वजनिक शौचालयाच्या दरवाजांना मोठी भगदाडे पडली असून साड्यांचा आडोसा लावून त्याचा वापर करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही पालिका प्रशासन कानाडोळा करीत असल्याने या शौचालयाचा वापर करणाऱ्या महिलांची प्रचंड कुचंबणा होत आहे.
तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघातील इंदिरानगर येथील महिला शौचाल यांचे दरवाजे अक्षरशः खिळखिळे झाले असून दरवाजांना मोठमोठे होल पडले आहेत. महिलांना शौचालयाचा वापर करण्याआधी साड्यांचे आडोसे लावावे लागत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत छायाचित्रांसह तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप इंदिरानगरमधील महिलांनी केला. शौचालये बांधून झाली की पुन्हा त्याकडे बघण्याची तसदीदेखील प्रशासन घेत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांनी केला आहे.