
निलंगा तालुक्यातील कलांडी, खडकउमंरगा आणि डांगेवाडी या गावात (२९ सप्टेंबर) राञी अवघ्या दोन तासांत भूगर्भातून पाच वेळा भयंकर आवाज झाल्याने धरणी हलल्याचा अनुभव नागरिकांना आला. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांनी घराबाहेर पळ काढत पावसात रस्त्यावर आश्रय घेतला. हजारो नागरिक रात्रभर पावसात रस्त्यावर थांबले असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. “आम्ही वारंवार प्रशासनाला माहिती दिली, पण कोणीही गावात फिरकले नाही,” असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, या आवाजानंतर जमिनीमध्ये कंप जाणवत असून घरांच्या भिंती थरथरत आहेत. त्यामुळे गावात अफवांनाही उधाण आले आहे. काहींचे म्हणणे आहे की, हे भूगर्भातील हालचालीमुळे होत असावे, तर काहींनी भूकंपाचा इशारा असल्याची भीती व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असून तातडीने तज्ज्ञांचा अहवाल घेऊन प्रशासनाने गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यानी या गावाना भेट दिऊन नागरिकांचे समाधान केले घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी आश्रय थांबावे व काळजी घ्यावी अशा सुचना केल्या आहेत.