तो मराठी संस्कृती आणि राजकारणातील साडे चारावा मुहूर्त असेल! शिवसेना-मनसे युतीवर संजय राऊत काय म्हणाले?

सहा दशकांपासून महाराष्ट्राची परंपरा बनलेला शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असून ते शिवसैनिकांना कोणता विचार देतात आणि अतिवृष्टीसह विविध प्रश्नांवरून राज्यकर्त्यांवर कसा आसूड ओढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे या मेळाव्यात शिवसेना-मनसे युतीची घोषणा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी विधान केले आहे.

साडे तीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी शिवसेना-मनसे युतीची घोषणा होणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, साडे तीन मुहूर्त हा प्रकार नक्की आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना साडे तीन मुहूर्त पाहून स्थापन केली नव्हती. शिवसेना ही गुढीपाडवा, दसरा, अक्षयतृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली, त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल. त्याचे उत्तर एवढेच आहे की, ज्या दिवशी ती घोषणा होईल, त्या दिवशी तो साडे चारावा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातील. मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल.

भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाकडून डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. यावर विचारले असता राऊत म्हणाले की, अल्पसंख्यांक मोर्चाकडून का, मोहन भागवत यांच्याकडून किंवा मूळ पदाधिकाऱ्यांकडून का नाही? म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांचे राजकारण करायचे आणि संघ हा सर्व समावेशक आहे हे दाखवायचे. तुम्ही आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. हेडगेवारांना तुम्ही जे द्यायचे ते देणार आहात. तुमची तयारी सुरू आहे. पण सगळ्यात आधी सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मुळ मागणी होती त्याचे काय? सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार करता येईल.

शिवतीर्थावर शिवसेनेचा, तर नागपुरात RSS चा; हे दोनच दसरा मेळावे, इतर सर्व चोरबाजार, संजय राऊत यांचे परखड मत

बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा असे आपल्याला का वाटत नाही? हेडगेवारांनी हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना केली असे आपण म्हणत असाल तर बाळासाहेबांनी हिंदुत्व पेटवले, जागवले आणि रुजवले म्हणून आजचा भाजप सत्तेत दिसतोय. नाही तर आजचा भाजप चणे-फुटाणे विकत बसता असता. आजच्या भाजपचे जे यश आहे त्या मागे बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे, असेही संजय राऊत म्हणाले.