एमआयडीसीत कारचालकावर गोळीबार : दोघांना अटक

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात हॉटेलसमोरील कारच्या समोर लघवी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून कारचालकाचा पाठलाग करून गोळीबार केल्याची घटना सोमवार, २२ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. या गोळीबार प्रकरणातील आरोपी गणेश जनार्धन औताडे (२५) व धीरज संतोष थोरात (२५, दोघेही रा. हसूल) या दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणातील तिघे अद्यापही फरार असून, पोलिसांना गुंगारा देत आहेत.

बाळूज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या कमळापूर येथील तौफिक शफीक पठाण (३०) व त्याचा मित्र निसार जब्बार खान (रा. वैशाली डाब्याजवळ, मिसारवाडी) हे स्कोडा कारमधून (एमएच २० डीजी ०४५०) २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता पाम्स हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते, जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गार्डासमोर एकजण लघवी करत होता. यावेळी तौफिक पठाण व निसार खान या दोघांचा लघवीच्या कारणावरून गणेश औताडे याच्याशी वाद झाला. त्यावेळी समोरील व्यक्तीने फोनवर भांडणाची माहिती दिली. हा वाद त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने माफी मागितल्याने मिटला होता.

वाद मिटल्यानंतर दहा मिनिटांनी हे दोघे तेथून निघाले. या दोघांनी त्यांची गाडी प्रोझोनकडे जात असलेल्या रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबविली होती. पाठीमागून एका स्कुटीवर तिघेजण आले. त्यांनी ‘रूक-रूक’ असा आवाज दिला. दुचाकीवरून आलेल्या एकाने कारजवळ येऊन त्याच्याजवळील बंदुकीने गोळीबार केला. कारमध्ये बसलेले तौफिक व निसार हे मागे सरकल्याने, तौफिक याच्या कानाजवळून गोळी गेली. या प्रकरणी तौफिक पठाण याच्या तक्रारीवरून गोळींबार करणाऱ्या स्कुटीवरून आलेल्या तिघांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ज्या लोकांसोबत व्यावसायिकाचे वाद झालेले आहेत अशांचा पोलिसांनी शोध घेतला. २६ सप्टेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भरत पाचोळे, पोलीस हवालदार संजय नंद, संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे आणि परशुराम यांनी सापळा रचून गणेश औताडे व धीरज थोरात या दोघांना सावंगी हसूल येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता उद्या १ ऑक्टोंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

तिघे अद्याप सापडेनात
हॉटेलच्या समोरील वादानंतर काही वर्णानी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. या वादानंतर निसार खान तौफिक पठाण हे स्कोडा गाडीतून निघाले. या वादाची माहिती गणेश व धीरज यांनी त्यांच्या मित्रांना दिली. त्यांचे तीन मित्र दुचाकीवरून आले. दुचाकीवरून आलेल्यांनी गोळीबार केला, अशीही माहिती पोलीस कोठडीतील आरोपी गणेश औताडे व धीरज थोरात या दोघांनी पोलिसांना दिली. मात्र, ते तिथे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी दिली.