
चिपळूण शहरातील प्रसिद्ध “नवसाचा चिपळूणचा राजा” गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील पुरग्रस्त बांधवांसाठी मायेचा ओलावा देत एक मदतीचा हात पुढे केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गावातील सुमारे ३५० कुटुंबांसाठी मंडळाच्या वतीने ६०० उत्तम दर्जाचे टॉवेल्स वितरित करण्यात आले.
मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे आणि नद्यांना आलेल्या महापुरामुळे ८०० ते ९०० गावांचे नुकसान झाले असून, गावातील नागरिक बेघर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी “चला देऊ मदतीचा हात” असे आवाहन करत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला “नवसाचा चिपळूणचा राजा” गणेशोत्सव मंडळाने त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रांताधिकारी लिंगाडे यांच्या समन्वयाने पाकणी गावातील गरजू कुटुंबांसाठी आवश्यक ती मदत पोहोचविण्यात आली.
या मदत उपक्रमाच्या प्रसंगी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, मंडळाचे अध्यक्ष श्री. शैलेश टाकळे, उपाध्यक्ष संदीप साडविलकर, सचिव बाळा आंब्रुळे, तसेच विश्वस्त आणि चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर टाकळे, रत्नदीप देवळेकर, मंडळ सदस्य प्रशांत मुळये, राजेश ओतारी, योगेश शेट्ये, श्लोक साडविलकर, ओंकार नलावडे, नील शेट्ये, प्रविण मेंगाणे आदी मान्यवर उपस्थित होते.


























































